

पुणे : स्मरणिका म्हणजे केवळ भूतकाळातील आठवणींचा दस्तावेज नसतो; तर त्या आठवणींना, भावनांना, अनुभवांना पुन्हा एकदा उजाळा देण्याचे काम स्मरणिकेतील लेखांमधून केले जाते. अशीच अनुभूती अटकेपार या सर्वस्पर्शी स्मरणिकेतून वाचक, साहित्यप्रेमींना मिळणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सातारा येथे होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त ही स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे.
मराठी साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा) आणि मावळा फाऊंडेशन या संमेलनाच्या आयोजक संस्था आहेत. सातारा मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याला प्राचीन इतिहास असून ही भूमी मराठ्यांचे शौर्य, पराक्रम तसेच स्वातंत्र्यसंग्रामातील योगदानासाठी प्रसिद्ध आहे.
मराठ्यांच्या सत्तेचे केंद्र असलेल्या सातारच्या भूमीतून मराठ्यांनी आपले शौर्य गाजवत अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत मराठा साम्राज्याचा झेंडा फडकवला. त्यामुळेच सातारा आणि अटकेपार यांचे समीकरण साम्राज्याचा विस्तार आणि पराक्रम दर्शविते. या पराक्रमाची आठवण म्हणून स्मरणिकेला अटकेपार असे नाव देण्यात आले आहे.
शतकपूर्व साहित्य संमेलनानिमित्त सातारा जिल्ह्याचा वैभवशाली इतिहास, संस्कृती, रंगभूमी चळवळ, खाद्यसंस्कृती, पत्रकारिता, पर्यटन, क्रीडा संस्कृती, कृषी व्यवस्था अशा सर्वस्पर्शी विषयांवर भाष्य करणारे लेख या स्मरणिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील अनेक लेखकांनी मायबोली मराठीविषयक आपले विचार या स्मरणिकेतून व्यक्त केले आहेत. या स्मरणिकेची मांडणी तीन विभागांत करण्यात आली आहे.
56 लेखांसह 270 पृष्ठांच्या स्मरणिकेत प्रत्येक पानावर सातारा, मराठी साहित्य आणि मराठी भाषा, याविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणाऱ्या तळटीप आहेत. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
मराठी साहित्य, मराठी भाषा आणि सातारा या तीन विषयांची गुंफण असलेली ही स्मरणिका अटकेपार पोहोचत संग्राह्य दस्तावेज ठरेल.
विनोद कुलकर्णी, कार्याध्यक्ष, अ. भा. म. सा. संमेलन संयोजन समिती