

मुंबई : आयआयटी मुंबईच्या प्रतिष्ठित टेकफेस्टमध्ये यंदा ‘डिफेन्स सिम्पोजियम 2.0’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात भारताच्या लष्करी नेतृत्वातील प्रमुख अधिकारी मंचावर येऊन राष्ट्रीय सुरक्षा, आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रभाव आणि संरक्षण क्षेत्रातील बदलत्या गरजांवर मार्गदर्शन करत आहेत. दुसऱ्या दिवशी तिन्ही दलांच्या माजी प्रमुखांनीविद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. टेकफेस्टच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे सैन्य दलांच्या माजी प्रमुखांनी मार्गदर्शन केले आहे.
सेनेने जपलेल्या मूल्यांमुळेच नागरिकांचा अढळ विश्वास! : माजी लष्कर प्रमुख मनोज पांडे
मुंबई : देशाच्या संरक्षण व्यवस्थेचा कणा असलेल्या सेनेवर नागरिकांचा जो अढळ विश्वास आहे, तो केवळ शस्त्रसज्जतेमुळे नाही, तर सेनेने जपलेल्या मूल्यव्यवस्थेमुळे आहे. स्वतःपेक्षा सेवा श्रेष्ठ या तत्त्वावर उभ्या असलेल्या सेनेमुळेच ती देशातील सर्वात विश्वासार्ह ‘ब्रँड’ ठरली आहे, असे प्रतिपादन माजी लष्कर प्रमुख मनोज पांडे यांनी आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये केले.
सीमेवर कठीण परिस्थितीत कार्यरत असलेले सैनिक कर्तव्य, त्याग आणि प्रसंगी सर्वोच्च बलिदानासाठी सदैव सज्ज असतात. याच मूल्यांमुळे नागरिक संरक्षण दलांकडे अंतिम आधार म्हणून पाहतात. सेना ही केवळ युद्ध लढणारी संस्था नसून, समाज ज्या मूल्यांकडे आशेने पाहतो त्यांचेच प्रतिबिंब आहे. विविध धर्म, भाषा आणि प्रदेशांतील सैनिक एकाच ध्येयासाठी एकत्र येतात, ही बाब सेनेला राष्ट्रीय एकात्मतेचे सर्वोत्तम उदाहरण बनवते, असेही ते म्हणाले.
कोणत्याही संस्थेची खरी ओळख तिच्या संस्कृतीत आणि मूल्यांत असते. मजबूत रणनीतीही भक्कम संघटनात्मक संस्कृतीशिवाय निष्फळ ठरते, असे सांगत त्यांनी सेनेतील ‘जिंकण्याची संस्कृती’ अधोरेखित केली. युद्धात दुसऱ्या क्रमांकाला स्थान नसते, म्हणूनच सेनेत सातत्याने उत्कृष्टतेचा ध्यास घेतला जातो, असे ते म्हणाले. संघटनात्मक संस्कृतीचे चार महत्त्वाचे पैलू मांडताना त्यांनी ‘लीड बाय एक्झॅम्पल’, ‘नाम-नमक-निशान’ ही भावना, कुटुंबवत्सल नाते आणि आयुष्यभर टिकणारी मैत्री यांचा उल्लेख केला. सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांशी असलेले नाते हे केवळ सेवेपुरते मर्यादित नसून आयुष्यभराचे असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
सेनेतील सात मूलभूत मूल्यांवर भाष्य करताना निष्ठा, कर्तव्य, आदर, स्वार्थरहित सेवा, सन्मान, प्रामाणिकपणा आणि वैयक्तिक धैर्य यांचे महत्त्व माजी लष्कर प्रमुख मनोज पांडे यांनी अधोरेखित केले.
स्वदेशीकरणामुळे नौदलाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल! : माजी नौदल प्रमुख आर. हरी कुमार
मुंबई : देशात 2047 पर्यंत पूर्णपणे आत्मनिर्भर नौदल उभारण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने निश्चित केले असून, त्या दिशेने भारतीय नौदलाने ठोस पावले टाकली आहेत. आज 60 हून अधिक युद्धनौका देशातच बांधल्या जात असून, ‘खरेदीदार नौदल’ ते ‘निर्माता नौदल’ असा मूलभूत बदल प्रत्यक्षात साकार होत असल्याचे प्रतिपादन नौदलाचे माजी प्रमुख आर. हरी कुमार यांनी आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये केले.
नौदलाच्या प्रगतीचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, जहाजबांधणीतील ‘फ्लोट, मूव्ह आणि फाइट’ या तीनही टप्प्यांत मोठ्या प्रमाणावर स्वदेशीकरण साध्य करण्यात आले आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेअंतर्गत सागरी क्षेत्र, नौदलाची भूमिका आणि आत्मनिर्भर नौदल उभारणीची दिशा याविषयी त्यांनी सविस्तर मांडणी केली.
समुद्र, सागरी व्यापार आणि नौदलाचे महत्त्व याबाबत देशात अद्याप पुरेशी जाणीव नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. भविष्यातील आर्थिक, तांत्रिक आणि सामरिक प्रगती मोठ्या प्रमाणावर सागरी क्षेत्रावर अवलंबून असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पृथ्वीच्या सुमारे 70 टक्के भाग महासागरांनी व्यापलेला असून, जगातील सुमारे 90 टक्के व्यापार समुद्रमार्गे होतो. तसेच 99 टक्के इंटरनेट डेटा समुद्राखालील केबल्सद्वारे वाहतो, हे वास्तव लक्षात घेता सागरी सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित होते, असे त्यांनी नमूद केले.
देशाची अर्थव्यवस्था वाढेल तशी व्यापारवृद्धी होणार असून, त्या व्यापाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी नौदलावर आहे. इंधनपुरवठा, आंतरराष्ट्रीय व्यापारमार्ग आणि सागरी हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी नौदल चोवीस तास सज्ज असते, असे मत नौदलाचे माजी प्रमुख आर. हरी कुमार यांनी व्यक्त केले.
‘ऑपरेशन सिंदूर’मधून देशाची ताकद पुन्हा ठळक! : हवाई दलाचे माजी प्रमुख विवेक राम चौधरी
मुंबई : देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांचे संयुक्त नियोजन, अचूक अंमलबजावणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने भारताची लष्करी क्षमता आणि सामरिक आत्मविश्वास पुन्हा एकदा स्पष्टपणे अधोरेखित केला. या मोहिमेत भारतीय हवाई दलाची भूमिका निर्णायक ठरल्याचे प्रतिपादन हवाई दलाचे माजी प्रमुख विवेक राम चौधरी यांनी केले.
ऑपरेशन सिंदूरची पार्श्वभूमी स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, 7 मे रोजी पहाटे भारताने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. तिन्ही दलांच्या संयुक्त नियोजनामुळे आणि काटेकोर अंमलबजावणीमुळे ही कारवाई यशस्वी ठरली. त्यानंतर 8 व 9 मे रोजी पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. लष्करी तळांसह नागरी भागांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला; मात्र भारताच्या एकत्रित संरक्षण व्यवस्थेमुळे हे सर्व हल्ले निष्फळ ठरले आणि देशात कोणतीही हानी झाली नाही, असे त्यांनी नमूद केले.
पाकिस्तानकडून लष्करी तळांवर हल्ले सुरूच राहिल्यानंतर भारताने 9 व 10 मे रोजी त्यांच्या हवाई तळांवर प्रभावी प्रतिहल्ला केला. अत्यंत अचूक आणि नियोजित कारवाईमुळे पाकिस्तानचे प्रमुख हवाई तळ निष्क्रिय झाले आणि त्यानंतर त्यांनी माघार घेतली, असे चौधरी यांनी सांगितले.
ऑपरेशन सिंदूरने भारताची सामरिक सज्जता, तांत्रिक क्षमता आणि संयुक्त लष्करी कार्यपद्धती यांचे प्रभावी दर्शन घडवले असून, भारताचे लष्करी वर्चस्व अधिक ठोसपणे अधोरेखित झाले आहे, असा निष्कर्ष हवाई दलाचे माजी प्रमुख विवेक राम चौधरी यांनी अधोरेखित केला.