Ajit Pawar Sharad Pawar alliance : 26 डिसेंबरला पवारांच्या आघाडीची पुण्यात घोषणा

29 महानगरपालिकांच्या महासंग्रामात आता वेगळी चूल मांडण्याची तयारी अजित पवारांची तयारी
Ajit Pawar Sharad Pawar alliance
26 डिसेंबरला पवारांच्या आघाडीची पुण्यात घोषणाPudhari
Published on
Updated on

पुणे/ मुंबई : मुंबईत शिवसेना-मनसे युती जाहीर होण्याची लगबग सुरू असताना दुसरीकडे पुण्यातही मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत. काका शरद पवारांविरोधात बंड पुकारून पक्ष फोडणारे त्यांचे पुतणे अजित पवार आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवारांसह आघाडीत जाण्याची शक्यता आहे. या आघाडीची घोषणा 26 डिसेंबर रोजी होईल आणि तेव्हाच सारे काही कळेल, असे अजित पवार यांनीच सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या बैठकांनंतर महायुतीच्या जागावाटपात स्थान मिळणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महासंग्रामात आता वेगळी चूल मांडण्याची तयारी अजित पवारांनी केली आहे.

Ajit Pawar Sharad Pawar alliance
Navi Mumbai airport : नवी मुंबई विमानतळाचे उद्यापासून ‌‘टेकऑफ‌’ !

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढण्याचे ठरवल्याने या पक्षाला महायुतीत घेण्यास भाजपने नकार दिला. नाशिकमध्येही राष्ट्रवादीसोबत जागावाटपाच्या चर्चेला भाजपने नकार दिला. पिंपरी चिंचवडमधील परिस्थिती लक्षात घेता तेथे स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला होता. मात्र आता तेथेही शरद पवार गटाशी युती होण्याची शक्यता दिसत आहे. पुण्यातही काका-पुतणे एकत्र येण्याची तयारी सुरू झाली असून महायुतीत जागा नसल्यामुळे हा निर्णय अपरिहार्यपणे घ्यावा लागत असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने घेतली आहे.

शरद पवार गटात दुमत

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यास तीव्र विरोध दर्शवत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. प्रशांत जगताप यांनी सुरुवातीपासूनच अजित पवार यांच्या गटासोबत कोणत्याही प्रकारची युती नको, अशी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र प्रशांत जगताप यांचा राजीनामा अद्याप माझ्यापर्यंत आला नसल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

विश्वासात घेऊन निर्णय

विशेष म्हणजे, पुणे आणि पिंपरी - चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) कडून अधिकृत प्रस्ताव आलेला नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मंबईत सांगितले. पुण्यात अजित पवार यांच्या पक्षाचे काही पदाधिकारी आणि आमच्याकडील काही पदाधिकाऱ्यांची आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. परंतु, स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पक्ष अशा प्रकारचा निर्णय घेणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी आघाडीबाबत आमची चर्चा सुरू आहे. काँग्रेसनेही सोबत यावे, अशी आमची इच्छा आहे, असे त्या पक्ष कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

Ajit Pawar Sharad Pawar alliance
BMC Election 2026 : मुंबईत काँग्रेस-उद्धव आमने-सामने

महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवल्यास पक्षाला काय फायदा होईल आणि अजित पवार यांच्या सोबत गेल्यास काय तोटा होईल, याचे सविस्तर राजकीय गणित मांडले होते. खुद्द शरद पवार यांनीही सुरुवातीला दादांच्या गटासोबत न जाण्याचे संकेत दिले होते. मात्र अचानक खासदार सुप्रिया सुळे यांनी स्थानिक नेत्यांना अजित पवार यांच्या गटाशी चर्चेचे निर्देश दिल्याने प्रशांत जगताप प्रचंड नाराज झाले आहेत.

पुण्यात राष्ट्रवादीची काँग्रेससोबतही चर्चा

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुण्यासाठी काँग्रेसशीही संपर्क साधला आहे. अजित पवार यांनी काँग्रेसचे निरीक्षक माजी मंत्री सतेज पाटील यांच्यासोबत आघाडी म्हणून पुणे महापालिकेत एकत्र निवडणूक लढवण्याबाबत प्राथमिक चर्चा केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले. मात्र शरद पवार जर अजित पवार यांच्यासोबत जाणार असतील तर शिवसेना ठाकरे गट त्यांच्यासोबत जाणार नाही. शिवसेना आणि मनसे एकत्र पुणे महानगरपालिकेत लढतील, अशी घोषणा संजय राऊत यांनी केली असल्याने या नव्या आघाड्या कशा पद्धतीने होतील याबाबत अनिश्चितता आहे.

काँग्रेसमध्ये दोन तट

पुण्यातील युतीसाठी अजित पवार यांचा फोन आला होता, त्याबद्दल योग्य वेळेला निर्णय घेतला जाईल असे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या काही मंडळींनी मात्र महायुती सरकारचा भाग असलेल्या अजित पवार गटाशी युती करणे अशक्य असल्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेस श्रेष्ठींकडे या निर्णयाची माहिती आणि त्यावरचे आक्षेप कळवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

  • महापालिका निवडणुकीत स्वबळावर किंवा महायुती सोडून सोयीच्या आघाड्यांसह लढण्याच्या निर्णयापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आला आहे. मात्र महायुती विरोधातील ही भूमिका केवळ महापालिका निवडणुकीपर्यंत मर्यादित असून हा राष्ट्रवादी सरकारचा भाग असेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news