पुणेकरांची विमान भरारी; आंतरराष्ट्रीय उड्डाणांची आकडेवारी वाढली

पुणेकरांची विमान भरारी; आंतरराष्ट्रीय उड्डाणांची आकडेवारी वाढली

पुणे : पुढारी वृत्तसेवा

देशातील विमानतळांवरून देशांतर्गत विमान वाहतुकीत वाढ होत असून, दिवसाला विविध ठिकाणांहून 7 लाख 42 हजार 114 प्रवाशांची ये-जा सुरू असते. विविध राज्य, जिल्ह्यातील विमानतळांहून दररोज 5 हजार 610 विमानांची उड्डाणे होत आहेत. कोरोनानंतर पहिल्यांदाच देशांतर्गत विमान वाहतुकीत 27 मे रोजी वाढ झाली.

या संदर्भातील माहिती ट्वीटद्वारे केंद्रीय नागरी विमानमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी दिली. स्पाईस जेट, एअर इंडिया, इंडिगो, विस्टारा, गो फर्स्ट, एअर एशिया इंडिया यांसारख्या विमान कंपन्या देशात विमान वाहतूक सेवा पुरवतात. याच कंपन्यांच्या विमानाद्वारे विविध विमानतळांवरून 27 तारखेला 7 लाख 42 हजार 114 प्रवाशांनी प्रवास केला आहे.

कोरोना काळात होती फक्त 12 उड्डाणे

पुणे विमानतळावरून शुक्रवारी (दि. 27) 78 विमानांची उड्डाणे झाली. आता दररोज सरासरी 70 ते 80 विमानांची उड्डाणे पुणे विमानतळावरून होत आहेत. कोरोनाकाळात धावपट्टीच्या कामाकरिता काही दिवस विमानतळ बंद होते. त्यानंतर अनलॉक झाल्यावर सुरुवातीला दररोज 10 ते 12 विमानांची उड्डाणे होत होती. कालांतराने त्यात वाढ होत गेली. आता दररोज 70 ते 80 च्या घरात विमानांची उड्डाणे होत आहेत.

दररोज 824 आंतरराष्ट्रीय उड्डाणे

देशातील आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमध्ये सुध्दा वाढ होत आहे. देशातील विविध विमानतळाहून दररोज सरासरी 824 विमानांची उड्डाणे होत आहेत. त्याद्वारे दिवसाला 1 लाख 43 हजार 277 प्रवासी विविध देशांमध्ये प्रवास करतात. यासंदर्भातील माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news