जुन्नरला सुरू झाली विधानसभेची लगीनघाई!

जुन्नरला सुरू झाली विधानसभेची लगीनघाई!

[author title="सुरेश वाणी" image="http://"][/author]

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीचा धुरळा अद्याप संपला नसताना आणि निकाल लागला नसला, तरी जुन्नर तालुक्यामध्ये मात्र विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. विविध पक्षांच्या इच्छुकांनी आपापल्या पद्धतीने चाचपणी करून मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. जुन्नर तालुक्यात महाविकास आघाडीच्या वतीने अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आळेफाटा या ठिकाणी शनिवारी (दि. 18) मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये जुन्नरचा आमदार महाविकास आघाडीचाच होणार, अशी सिंहगर्जना अमोल कोल्हे यांनी केली.

जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर सहा महिने तटस्थ होते. आगामी सन 2024 ची विधानसभेची निवडणूक लढविण्याच्या मन:स्थितीत नाही, असेही त्यांनी घोषित केले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे जुन्नर तालुक्याच्या दौर्‍यावर आल्यावर आमदार बेनके यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत 'मी अजित पवार यांच्यासोबत राहणार' अशी घोषणा केली होती. आता ते '2024 ची निवडणूक मी लढवणार आणि आमदार मीच होणार,' असे सांगत आहेत. अर्थात, लोकसभा निवडणुकीचे निकाल कसे लागतात, महायुती तसेच महाविकास आघाडी राहते किंवा नाही, याचा अंदाज कोणालाच नसला, तरी पुढची तयारी मात्र जोरात सुरू असल्याचे पाहायला मिळते.

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेसाठी महायुती राहिली तर विद्यमान आमदार अतुल बेनके यांना महायुतीची उमेदवारी मिळू शकते. माजी आमदार शरद सोनवणे व भाजप नेत्या आशाताई बुचके यांना मात्र वेगळा पर्याय शोधावा लागू शकतो. माजी आमदार शरद सोनवणे यांनी आपली भूमिका यापूर्वी जाहीर केली आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळो अथवा न मिळो, वेळ पडली तर मी अपक्ष देखील उभा राहू शकतो. परंतु, विधानसभेची निवडणूक मी लढणारच, असे त्यांनी सांगितले आहे. महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या अधिक आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला उमेदवारी अपेक्षित आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी बैठक घेऊन याबाबतचा ठराव पक्षप्रमुखांना पाठविला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून माजी आमदार बाळासाहेब दांगट, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, नारायणगावचे माजी सरपंच बाबू पाटे या तिघांच्या नावांची चर्चा आहे. शिवसेना फुटीनंतर जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब दांगट यांना मातोश्रीवर बोलावून घेऊन उद्धव ठाकरे यांनी दांगट यांना शिवसेनेत घेऊन तुमची पक्षाला गरज आहे. तुमच्यानंतर जुन्नरवर भगवा फडकला नाही, असे विधान केले होते. त्यामुळे बाळासाहेब दांगट देखील आमदारकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

जुन्नर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे नेते तसेच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे यांच्यासाठी जीव लावून काम केले आहे. तसेच शरद पवार यांच्याशी त्यांची जवळीक अधिक वाढली आहे. जुन्नरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा दावा असल्याने सत्यशील शेरकर यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन उमेदवारीसाठी हाती तुतारी घ्यावी लागू शकते. त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची संमती घ्यावी लागणार आहे.
विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची एकमुखी ताकद तसेच तरुणांचा मोठा संच ही सत्यशील शेरकर यांची मोठी जमेची बाजू आहे. लोकसभा निवडणुकीच्या सहा महिने अगोदर सत्यशील शेरकर यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशाताई बुचके यांनी जुन्नर तालुक्यात भाजपचे जाळे वाढविले आहे. आता त्यांच्या मदतीला विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष गणेश कवडे आले आहेत. कवडे यांची जुन्नर तालुक्यात युवकांमध्ये चांगली क्रेझ आहे. आशाताई बुचके यांना पक्षाने एखादे महामंडळ दिले अगर विधानपरिषदेवर आमदार म्हणून घेतले, तर गणेश कवडे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.
एकंदरीत, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभेच्या निवडणुकीची गणिते मांडली जाऊ शकतात. तोपर्यंत मात्र वेगवेगळी चर्चा, अंदाज मांडले जाऊ शकतात.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news