

Shri Vighnahar Ganpati Ozar
सुरेश वाणी, नारायणगाव
महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या अष्टविनायकांतील सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. नवसाला पावणारा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नेश्वर. या ठिकाणी दर्शनाला महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून भक्त येतात. या गणपतीला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा.
ओझरमधील श्री विघ्नहर हा अष्टविनायकांपैकी सर्वांत श्रीमंत गणपती आहे. ओझर हे गाव कुकडी नदीवर वसलेले गाव आहे. ओझर गाव व परिसरातील सर्वच लोक विघ्नहर्ताची मनोभावे पूजाअर्चा करीत असतात. विशेष म्हणजे, या गावात कोणाच्याही घरात गणपतीची स्थापना होत नाही. जुन्नर तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती ओझरच्या गणरायाला यथाशक्ती दानाचे कार्य करीत असते. ओझरला विघ्नेश्वराच्या दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक मनोभावे पूजा तर करतोच; शिवाय देणगीरूपाने सढळ हाताने अर्थसाह्य देखील करीत असतो. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची देवस्थान ट्रस्टच्या वतीने विशेष काळजी घेतली जाते. अल्पदरात जेवण दिले जातेच; शिवाय कोणत्याही भाविकाची दर्शनाची, महाप्रसादाची आणि राहण्याची गैरसोय होणार नाही, याबाबतची विशेष काळजी घेतली जाते.
राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सुरू केला. यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासुर राक्षसाची उत्पत्ती केली. त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरुवात केली. यामुळे ऋषिमुनींनी विघ्नासुराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासुर गणपतीला शरण गेला. गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. विघ्नासुराने गणपतीला विनंती केली की, तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांनी घ्यावे व तुम्ही येथेच वास्तव्य करावे. विघ्नासुराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी 'विघ्नहर' या नावाने वास्तव्य करू लागला.
१७८५ मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला. विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे २० फूट लांब सभागृह असून, आतील गाभारा १० बाय १० फुटांचा आहे. मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भिंत आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर आणि नाभीवर हिरे आहेत. परिसरामध्ये भव्यदिव्य कुकडी नदीचे निसर्गरम्य वातावरण आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना गणरायाचे दर्शन झाल्यावर नदीपात्रात नौकाविहार करण्याची सोय आहे. परिसर वृक्षारोपणाने नटलेला पाहायला मिळतो. या गावातील प्रत्येक नागरिक मंदिर परिसर व गाव स्वच्छ राहण्यासाठी विशेष काळजी घेत असतो आणि म्हणूनच संपूर्ण अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नहर्ताचे सर्वांत प्रथम क्रमांकाने सर्वत्र आदराने नाव घेतले जाते. या ठिकाणी विश्वस्तांबरोबर गावकऱ्यांचा देखील मोठा एकोपा पाहायला मिळतो.
भाद्रपद गणेश जयंतीला येथे चार दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो. यात्रेमध्ये संपूर्ण गाव सहभागी होत असतो. आपल्या घरात उत्सव आहे, असे प्रत्येक जण समजून या जन्मोत्सव सोहळ्याला साथ देत असतो. एवढेच नाही, तर या ठिकाणी येत असलेल्या भाविकांची प्रत्येक जण मनोभावे काळजी घेत असतो. या ठिकाणी निवासासाठी येणाऱ्या भाविकांची देवस्थान ट्रस्टबरोबरच गावचा प्रत्येक नागरिक काळजी घेताना दिसत असतो. या ठिकाणी महाराष्ट्रामधून येणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहन पार्किंगची मोठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी मोठमोठे भक्तभवन आहेत. गोरगरिबांचे विवाह या ठिकाणी अल्पदरात गेल्या अनेक वर्षांपासून लावले जात आहेत. गणेश जयंती, गणेश चतुर्थी व इतर उत्सवांच्या वेळी लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात. प्रत्येक भाविकाची मनोभावे सेवा विश्वस्तांबरोबर गाव देखील करीत असते.