

सोलापूर : यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक म्हणजेच इको-फ्रेंडली गणपतीला विशेष प्राधान्य मिळताना दिसत आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी मातीच्या व शाडूच्या मूर्ती, तसेच बीजमूर्ती व पुनर्वापर करता येणार्या गणेशमूर्तींना नागरिकांचा जास्त प्रतिसाद मिळत आहे. शहरात ठिकठिकाणी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे पाच स्टॉल उभारण्यात आले आहेत. यंदा दहा हजार पर्यावरणपूरक गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना होण्याची शक्यता आहे.
गणपती विसर्जनामुळे नद्या व तलावांमध्ये होणारे प्रदूषण टाळण्यासाठी अधिकाधिक सोलापूरकरांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, यासाठी प्रयत्नशील असलेल्या इको फ्रेंडली क्लबच्या वतीने यंदाही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मातीच्या गणेशमूर्ती उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सात रस्ता, गांधीनगर परिसरात मातीच्या गणेशमूर्तींचा स्टॉल उभारण्यात आला आहे. मूर्तिकार विष्णू सगर, आशिष माशाळे यांच्याकडून शाडू माती आणि लाल मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवून घेतल्या आहेत. तासाभरात या मूर्ती विरघळतील. घरीही या मूर्तींचे विसर्जन करता येऊ शकते. इको फ्रेंडली रंगांचा वापर केला आहे. सोलापूरकरांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची नोंदणी केली आहे.
यंदा दहा हजार बाप्पांच्या मूर्तींची स्थापना होण्याची शक्यता आहे. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था व नागरिक पुढाकार घेत आहेत. काही कलाकारांनी मातीसोबतच गायीच्या गोवर्या, कागदाच्या लगद्यापासून, तसेच बियाणे मिसळून खास गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. या मूर्ती विसर्जनानंतर झाडे उगवण्यास मदत होते. पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागतो. महापालिका प्रशासनाच्या वतीने प्रबोधन केले जात असल्याने इको-फ्रेंडली गणपतीची क्रेझ वाढली आहे.