

‘गणपती’ संरक्षणाचे आणि मांगल्याचे प्रतीक असून, पार्वतीने संरक्षणासाठीच त्याची स्थापना केली असल्याचे पुराणात सांगितले. पृथ्वीपासून म्हणजे मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्तीचे पूजन करतो, म्हणून त्याला पार्थिव मूर्ती असे म्हणतात. येणार्या सर्व संकटांचे हरण करावे, अशा संकल्पाने गणेशाच्या मूर्तीची स्थापना आणि पूजा करत असतो, तसेच मांगल्याचे प्रतीक म्हणूनही गणपतीचे पूजन केले जाते.
मोहन दाते, पंचांगकर्ते
भाद्रपद शुक्ल चतुर्थी ही ‘गणेश चतुर्थी’ म्हणून सर्वत्र उत्साहात, आनंदात साजरी केली जाते. गणपती हा विघ्नहर्ता आहे, कोणत्याही संकटातून तो आपल्याला बाहेर काढू शकेल, अशी लोकांची श्रद्धा असते. त्यामुळे या उत्सवाला एक वेगळेच महत्त्व आहे. सर्व दैवतांमध्ये गणपतीचं पूजन अग्रक्रमाने करावं, असं शास्त्र सांगतं. त्यामुळे या आद्य दैवताच्या पूजेसाठी प्रत्येकजण मोठ्या उत्साहाने तयार होत असतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराष्ट्रात घरोघरी गणपतीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना मोठ्या भक्तिभावाने केली जाते. दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी गणेशाची मूर्ती आणून त्याची स्थापना आणि पूजन केले जाते. हा पूजाविधी करण्यामागे एक पौराणिक कथा आहे. पार्वतीने गणपतीची स्थापना संरक्षणाच्या उद्देशाने केली होती.
पार्वतीमाता स्नान करत असताना या गणपतीने संरक्षण करावे, कोणालाही आत येऊ देऊ नये अशी पार्वतीची आज्ञा असल्यामुळे भगवान शंकर आल्यावरही गणपतीने त्यांना प्रतिबंध केला. त्यामुळे शंकरांनी त्याचे मस्तक छेदले. पार्वतीने हे पाहिल्यानंतर तिचा शोक अनावर झाला आणि तिने शंकरांना सांगितले की, हा माझा स्थापित केलेला पुत्र होता. तेव्हा तुम्ही त्याला पुन्हा जिवंत करा. त्यावेळी शंकरांनी आपल्या गणांना आज्ञा देऊन प्रथम दिसेल त्याचे शीर्ष आणावयास सांगितले. गणांनी हत्तीचे शीर्ष आणले आणि ते शंकरांनी गणपतीच्या मृत शरीरावर बसवले. त्यानंतर गणपती हा ‘गजानन’ या अर्थाने प्रसिद्ध झाला.
पृथ्वीपासून म्हणजे मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्तीचे पूजन करतो, म्हणून त्याला पार्थिव मूर्ती असे म्हणतात. येणार्या सर्व संकटांचे हरण करावे, अशा संकल्पाने आपण गणेशाच्या मूर्तीची स्थापना आणि पूजा करत असतो. तसेच मांगल्याचे प्रतीक म्हणूनही गणपतीचे पूजन केले जाते.
यंदाच्या वर्षी गणेशोत्सव 10 ऐवजी 11 दिवसांचा आहे. भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी ब—ाह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे 4.50 ते दुपारी 1.53 पर्यंत घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल. त्याकरिता भद्रादि (विष्टि) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची गरज नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना मध्यान्हानंतरही करता येऊ शकते. ज्या गणेशाचे आवाहन आपण सुमुहूर्तमस्तु म्हणजे तू स्वतःच एक सुमुहूर्त आहेस असे म्हणून करतो, त्याच्या पूजनासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, विष्टिकरण तसेच राहुकाल, शिवालिखित इत्यादी कोणतीही कोष्टके पाहण्याची गरज नाही. प्रात: कालापासून मध्यान्हापर्यंत कोणत्याही वेळी स्थापना व पूजा करता येते.
घरी स्थापन करण्यासाठीची मूर्ती आसनस्थ म्हणजे दोन्ही पायांची मांडी घातलेली असावी किंवा एक पाय खाली सोडलेला असावा. मूर्तीची मुद्रा सुबक आणि प्रसन्न वाटेल, अशी असावी. विशेषतः, गणपतीचे डोळे शांत आणि प्रसन्न असा प्रकारचे असावेत. कारण, डोळ्यांमध्येच सगळे भाव असल्यामुळे ते जर सुबक असतील तर संपूर्ण मूर्ती ही सुबक आणि संपन्न वाटते. गणपतीला गळ्यात हार घालता येईल, अशा प्रकारची मूर्ती असावी, अन्यथा काही ठिकाणी हात कानाला चिकटलेले असतात. अशा वेळी हार घालता येत नाही. मूषक हे गणपतीचे वाहन असल्यामुळे त्याचे पायाशी चित्र असावे. तसेच हातात फूल, मोदक, एक हात आशीर्वादासाठी आणि एका हातात शस्त्र असावे. मूर्तीचे पूजन करून आपला जो संकल्प आहे त्याची सिद्धी व्हावी, याच हेतूने पूजा केली जाते. त्यामुळे डावीकडे सोंड असलेला गणपती मवाळ आणि उडवीकडे सोंड असलेला गणपती कडक, असा विचार भाविकांनी मनात आणू नये.
पूजा हा एक उपचार असतो. त्यामध्ये भक्तिभाव हा महत्त्वाचा आहे. आपण जेव्हा गणपतीची मूर्ती आणतो तेव्हा त्या मूर्तीमध्ये देवत्व येण्यासाठी प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणून आवाहन केले जाते. स्नान, पंचामृत स्नान, उष्णोदक स्नान, अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक यावेळी केला जातो. हे सर्व करताना गणेशाची मूर्ती पार्थिव असल्यामुळे फुलांनी पाणी शिंपडून हे उपचार करावेत. गणपतीचं आगमन होतं त्या दिवशी त्याची षोडशोपचार पूजा झाली पाहिजे. नंतर मात्र पंचोपचार पूजा केली तरी चालते. षोडशोपचार पूजा म्हणजे, आवाहन, आसन, पाद्यस्नान, अर्घ्यस्नान, स्नान, पंचामृत स्नान, अत्तर लावून उष्णोदक स्नान, अभिषेक, गंध, अक्षता, हळद-कुंकू, वस्त्र, सुगंधी द्रव्ये म्हणजे अष्टगंध, शेंदूर इत्यादी, फुले-हार, विविध प्रकारची पत्री, दुर्वांची जुडी, तुळशीची पाने, धूप, दीप, नैवेद्य इत्यादी प्रकारे हे पूजन केले जाते.
गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना केलेल्या पार्थिव गणेशमूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक आहे आणि ते पाण्यामध्ये करावे असे धर्मशास्त्र सांगते. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे, असे नसून पाण्यात विसर्जन करावे, असे आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये, तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यात सुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी. प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा तत्सम पाण्यात न विरघळणार्या पदार्थांची मूर्ती नसावी. जेवढे दिवस गणपती घरात असेल, तेवढे दिवस दररोज नित्यनियमाने सकाळ-संध्याकाळ त्याची पूजाअर्चा, आरती अवश्य करावी. नैवेद्य दाखवून प्रसाद घ्यावा. गणपतीला दूर्वा फार प्रिय आहेत. त्यामागेही एक कथा आहे.
पुराणकाळात अंगारक नावाचा एक राक्षस होता. तो देवांना फार त्रास देत असे. त्या राक्षसाचा गणपतीने संहार केला. या संहारानंतर गणपतीला बराच त्रास होऊ लागला. कोणत्याही गोष्टीने तो शमेना. यावर बरेच उपाय करण्यात आले; पण गणपतीचा त्रास काही कमी होत नव्हता. यावर ऋषीमुनींनी एक उपाय केला. त्यांनी दूर्वा तोडून त्याचा भारा गणपतीच्या मस्तकावर ठेवला. दूर्वा या शीतल असतात. यामुळे गणपतीच्या अंगाचा दाह कमी झाला. त्यामुळे गणपतीला दूर्वा या प्रिय आहेत. त्यामुळे त्याच्या पूजेच्या वेळी त्या गणपतीला अवश्य वहाव्यात. मंदाराच्या झाडामध्ये गणपतीचा वास असतो, असं शास्त्र सांगतं. हे झाड गणपतीला फार प्रिय आहे. त्यामुळे मंदाराची फुलं वाहून गणपतीची पूजा करावी. याशिवाय जास्वंदीचं फुलही गणपतीला प्रिय आहे. त्यामुळे पूजेमध्ये त्याचाही समावेश असावा.