

Chintamani Ganpati
सीताराम लांडगे, लोणी काळभोर : अष्टविनायकांपैकी पाचव्या स्थानावर असलेला थेऊर येथील श्री चिंतामणी गणपती भक्तांच्या सर्व चिंता हरण करणार व मन प्रसन्न करणारा, असा बालस्वरूपातील गणपतीची मूर्ती असलेला आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख असून, पद्मासनात विराजमान आहे. दोन डोळ्यांत माणिक व बेंबीत हिरा आहे.
थेऊर हे पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व लाभलेले क्षेत्र असून, येथे अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. पुणे शहरापासून केवळ २५ किमी अंतरावर पुणे-सोलापूर महामार्गाशेजारी असलेले हे ठिकाण आहे. भाविक येथे नेहमीच दर्शनासाठी गर्दी करतात; परंतु संकष्ट चतुर्थीस आणि विशेषतः अंगारक योगावर दर्शनासाठी येथे मोठी गर्दी असते. गावच्या उत्तरेस यशवंत सहकरी साखर कारखान्याच्या मागच्या बाजूस श्री चिंतामणी गणपतीच्या आई-वडिलांची मंदिरे असून, ही मंदिरेसुद्धा सुरेख आहेत. भगवान विष्णू व महालक्ष्मी यांना श्री गणेशाचे रूप पाहून आपलाही मुलगा असाच असावा, हा मोह झाला. त्या वेळी श्री गणेशाने त्यांची ही इच्छा देवलोकी पूर्ण होणार नाही, तर भूलोकी श्री चिंतामणी गणपतीच्या रूपाने पूर्ण करण्याचे वरदान दिले. भगवान विष्णूचे माधव हे नाव असलेली मूर्ती ही केवळ थेऊर येथेच दिसून येते, तर सुमेदाच्या रूपाने साक्षात लक्ष्मीने अवतार घेतला आहे. या दोघांचा मुलगा श्री चिंतामणी गणपती होय!थेऊरचे पौराणिक नाव स्थावर क्षेत्र मन स्थिर होण्याचे ठिकाण, असा याचा अर्थ. स्वर्गलोकी देवतांसह अनेक ऋषी निवास करीत त्यापैकी असलेल्या कौंडण्य ऋषींचे मन अस्थिर होते. त्या वेळी त्यांनी स्थावर क्षेत्री येऊन भगवान गणेशाची आराधना केली. त्यानंतर त्यांचे मन स्थिर झाले, असे हे पवित्र ठिकाण होय. गावच्या पश्चिमेला या ऋषींचे निवासस्थान आहे.
श्रीमंत पेशव्यांचे आराध्य दैवत म्हणजे हाच श्री चिंतामणी होय. त्या वेळी थेऊर हे राजकीय वर्दळीचे ठिकाण असे. श्रीमंत माधवराव पेशवे यांची या देवावर अपार श्रद्धा होती. त्यामुळे या देवतेचे आशीर्वाद घेऊनच आपली कामे ते फत्ते करीत असत. त्यांना जेंव्हा आजाराने ग्रासले तेव्हा त्यांनी आपले शेवटचे दिवस येथेच घालविले. श्रीमंत रमाबाई पेशवे पती निधननंतर येथे सती गेल्या. त्यांचे हे स्मृती ठिकाण गावच्या पश्चिमेस मुळा-मुठा घाटावर आहे.
श्री चिंतामणी गणपतीबद्दल अनेक पौराणिक आख्यायिका आहेत. त्यात देवराज इंद्रदेव यांना वापरातून मुक्ती मिळावी, यासाठी नारदांनी याच स्थावर ठिकाणी कदंबतीर्थात स्नान करून गणपतीची आराधना करण्यास सांगितले. त्यानंतर गणपती प्रसन्न झाले आणि इंद्र शापातून मुक्त झाले. येथे अस्थिर झालेले चित्त मन स्थिर होते म्हणून या ठिकाणास पौराणिक नाव 'स्थावर' अथवा 'कदंबवन' असे असल्याची माहिती मुद्गल पुराण व गणेश पुराणात आढळते. दुसरी एक आख्यायिका आहे, ज्यामध्ये देवराज इंद्राने भगवान विष्णूची आराधना केली. त्यावर प्रसन्न होऊन विष्णूने आपल्याकडील चिंतामणीरत्न इंद्रास दिले. एक दिवस इंद्र पृथ्वीवर फिरत असताना कपिल मुनींच्या आश्रमात दुपारी पोहचले तेव्हा दुपारचे भोजन करण्याचा आग्रह त्यांनी इंद्राला केला. जेवण झाल्यावर मृत्युलोकांत इतके स्वादिष्ट भोजन पाहून इंद्रदेव प्रसन्न झाले. त्यांनी आपल्याकडील चिंतामणीरत्न कपिल मुनींना दिले. पुढे काही दिवसांनी तेथे धुंम्रासुर आपल्या हजारो सैनिकांसह कपिल मुनींच्या आश्रमात आला. त्यावर त्यांनाही भोजन करून जावे, अशी विनंती केली. परंतु, इतक्या लोकांना जेवण कसे मिळणार? हा प्रश्न पडला. त्यावर त्यांनी चिंतामणीरत्नाबद्दल सांगितले. शेवटी धुंम्रासुराने हे रत्न हिसकावून घेतले. त्यानंतर कपिल मुनींनी भगवान गणेशाची आराधना केली. गणेश प्रसन्न झाले व यज्ञातून प्रगट होऊन धुंम्रासुर, धुंम्रकेतू व धुंम्रवर्ण या राक्षसांचा वध केला.
श्रीक्षेत्र थेऊर हे पुणे शहरापासून जवळ असल्याने या ठिकाणी पोहचण्यासाठी पुणे शहरातून पुणे परिवहन महामंडळाची बस उपलब्ध असून, इतरही खासगी वाहतूक करणारी वाहने सहज उपलब्ध होतात. राज्यातील विविध भागांतून येणाऱ्या भाविकांसाठी पुणे हे मुख्य ठिकाण असून, येथून श्रीक्षेत्र थेऊर या ठिकाणी पोहचण्यासाठी बससेवा उपलब्ध आहे. येथे वर्षभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. परंतु, प्रामुख्याने भाद्रपद शुद्ध चतुर्थी व माघ शुद्ध चतुर्थी या दिवशी विशेष उत्सव असल्याने भाविक मोठ्या संख्येने श्री चिंतामणी दर्शनासाठी गर्दी करतात. प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला देऊळवाड्यात दर्शनासाठी मोठ्या रांगा लागतात. भाविकांना महाप्रसादाची सोय ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते. दुपारी चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने उपवासाची खिचडी वाटप केली जाते.