Pandit Yadavraj Phad: वारकरी संगीत ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची अमूल्य देणगी; आषाढी एकादशीनिमित्त ‘वैकुंठीचा राया’ कार्यक्रमात पं. फड यांचे गायन

किराना घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित यादवराज फड यांची भावना; दै. ‘पुढारी’च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
Pandit Yadavraj Phad
Pandit Yadavraj PhadPudhari
Published on
Updated on

पुणे: प्रत्येक प्रदेशाची स्वतःची संगीत परंपरा असते. महाराष्ट्राची खरी ओळख म्हणजे वारकरी संगीत आहे. संतांचे अभंग हे केवळ भक्तीचे गीत नसून, संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा विचार मांडणारे जीवन तत्त्वज्ञान आहे. अभंगांमध्ये फक्त महाराष्ट्राचा विचार नाही, तर संपूर्ण विश्वाच्या हिताचा संदेश दडलेला आहे, अशी भावना किराना घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित यादवराज फड यांनी व्यक्त केली.

जात्यावर दळताना स्त्रियांनी म्हटलेल्या ओव्यांतून अभंगगायनाचा प्रवास घडला. आईच्या ओव्यांतील सूरच अनेक मुलांच्या मनात संगीताची पहिली बीजे पेरतात. त्यामुळे आई ही संगीताची पहिली गुरू ठरते. वारकरी संगीत ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेची मोठी आणि अमूल्य देणगी आहे, असेही त्यांनी नमूद केले.

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त संतसाहित्याचा आणि विठ्ठलभक्तीचा गोडवा रसिकांपर्यंत पोहचविण्यासाठी 'वैकुंठीचा राया' हा विशेष सांगीतिक कार्यक्रम मंगळवारी (दि. २१ जुलै) सायंकाळी पाच वाजता जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला आहे.

'पुढारी' माध्यम समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या, विशाल चुगेरा प्रॉपर्टीजने प्रस्तुत केलेल्या आणि सणस ग्रुप समर्थित (पॉवर्ड बाय) असलेल्या या भक्तिरसाने न्हालेल्या अभंग मैफलीत पं. यादवराज फड हे आपल्या भावपूर्ण, रागदारीप्रधान आणि सुरेल गायकीतून संतश्रेष्ठांच्या निवडक अभंगांचे सादरीकरण करणार आहेत.

Pandit Yadavraj Phad
Sugar Price Hike: साखरेच्या दराला तेजीची उसळी; क्विंटलला ४६०० ते ४६५० रुपये दर

या कार्यक्रमानिमित्त 'पुढारी'शी संवाद साधताना पं. फड यांनी आपल्या संगीतप्रवासासह गुरू-शिष्य परंपरा, वारकरी संप्रदाय, भक्तिसंगीताचे महत्त्व आणि बदलत्या संगीतविश्वावर मनमोकळेपणाने भाष्य केले.

या कार्यक्रमात गायक सुनील पासलकर यांचे ही गायन होणार आहे, तर ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र खरे हे निरुपन करणार आहेत. कार्यक्रमात पं. यादवराज फड आणि सुनील पासलकर यांना शेखर दरवडे (तबला) , संजय गोगटे (ऑर्गन), दीपक दसवडकर (मृदंग), मुरलीधर पंडित आणि शिवाजी डाके (टाळ) , राधाकृष्ण गरड आणि अमोल मोरे (स्वरसाथ) हे साथसंगत करणार आहेत.

कोहिनूर ग्रुप आणि फोनिक्स लँडमार्क हे कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. के. जे. एज्‍युकेशनल इन्‍स्‍टिट्यूट हे को-पॉवर्ड बाय पार्टनर असून, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड (मल्टिस्टेट) हे फायनान्स पार्टनर आहेत. चाटे ग्रुप एज्युकेशन पार्टनर, तर पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी) हे डेअरी पार्टनर आहेत.

कुटुंबातूनच वारकरी संगीताचा वारसा लाभला, असे सांगत पं. फड म्हणाले की, माझा जन्म वारकरी कुटुंबात झाला. वडील भावार्थ रामायण गायचे, तर आजोबा भजन करायचे. त्यामुळे घरात भक्ती आणि संगीताचे वातावरण होते.

Pandit Yadavraj Phad
Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकर अडचणीत; व्यावसायिकाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

लहानपणी अनेक दिग्गज गायकांच्या मैफली ऐकण्याचा योग आला. त्यांचे गायन ऐकून आपणही असेच दर्जेदार संगीत शिकावे, अशी प्रेरणा मिळाली आणि शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाला सुरुवात झाली. पुढे त्याच अभ्यासातून वारकरी संगीताशी माझे नाते अधिक दृढ झाले.

शास्त्रीय संगीताचे महत्त्व स्पष्ट करताना पं. फड यांनी शास्त्रीय संगीत ही केवळ रागदारी शिकवणारी कला नाही. ती कलाकाराला कोणताही संगीतप्रकार समर्थपणे सादर करण्याची ताकद देते. अभंग, भजन, भावगीत, नाट्यसंगीत, गझल किंवा चित्रपटसंगीत असो, शास्त्रीय संगीताचा मजबूत पाया असेल तर प्रत्येक प्रकार सहज आत्मसात करता येतो. गुरूंनी मला स्वर, राग, लय आणि संगीताची शिस्त दिली. त्याच पायावर पुढील संगीतप्रवास उभा राहिला, असे स्पष्ट केले.

गुरुभक्तीमुळे लाभले पं. भीमसेन जोशी यांचे शिष्यत्व

संगीतातील आपल्या प्रवासात पहिले गुरू पं. सदाशिवराव जाधव यांचे स्थान सर्वाधिक महत्त्वाचे असल्याचे पं. फड यांनी सांगितले. त्यांच्याकडे आठ वर्षे अस्सल किराना घराण्याची तालीम घेतली. गुरूंविषयी असलेली माझी निष्ठा पं. भीमसेन जोशी यांच्या मनाला भावली. त्यानंतर त्यांनी स्वतः मला गाणे शिकण्यासाठी बोलावले. त्या क्षणाने माझ्या आयुष्याला नवी दिशा मिळाली, अशी आठवण त्यांनी सांगितली.

भक्तिसंगीत म्हणजे आत्मा आणि परमात्म्याचा संवाद

भजन आणि अभंग हे सगुण उपासनेचे प्रभावी माध्यम आहे. शब्द आणि सुरांच्या साहाय्याने विठ्ठलाचे रूप आपल्या अंतःकरणात साकार होते. त्या क्षणी आत्मा आणि परमात्मा यांची भेट घडते. काही अभंग गाताना आम्ही स्वतःही भावुक होतो. अनेक रसिकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून येतात, अशा शब्दांत पं. फड यांनी भक्तिसंगीताचे महत्त्व उलगडले.

'पुढारी'बद्दल व्यक्त केली कृतज्ञता

'पुढारी'च्या माध्यमातून बालगंधर्व रंगमंदिरात रसिकांसमोर सादर होण्याची संधी मिळत आहे. माझ्या पुण्यातील संगीतप्रवासातील हा अत्यंत आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण आहे. या कार्यक्रमातून रसिकांना संतांच्‍या अभंगवाणीचा आनंद घेता येईल, अशा शब्दांत पं. फड यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

संगीतबद्ध रचनाही ऐकायला मिळणार

'वैकुंठीचा राया' या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत चोखामेळा यांच्यासह अनेक संतांचे निवडक अभंग सादर होणार आहेत. पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेले काही अभंग तसेच स्वतः संगीतबद्ध केलेल्या रचनाही या मैफलीत रसिकांना ऐकायला मिळणार असल्याचे पं. यादवराज फड यांनी सांगितले.

कार्यक्रम कधी-कुठे?

दिनांक : मंगळवार, २१ जुलै

वेळ : सायंकाळी ५ वाजता

स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, पुणे

कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका येथे मिळतील

  • दैनिक ‘पुढारी’ कार्यालय, मित्रमंडळ चौक - सकाळी १० ते सायं. ६.

  • देसाई बंधू आंबेवाले, कर्वे रस्ता

  • ग्राहकपेठ, टिळक रस्ता

  • अमराळे ज्वेलर्स, कुंटे चौक, लक्ष्मी रस्ता

  • मोदीकेअर दालन,सक्सेस स्क्वेअर सोसायटी, महर्षी कर्वे पुतळ्याजवळ, कोथरूड

  • पूना गेस्‍ट हाऊस, बेलबाग चौकाजवळ, लक्ष्मी रस्‍ता

आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आणि संस्कृतीचा जिवंत वारसा आहे. लाखो वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत शिस्त, समता, सेवा आणि बंधुभावाचा संदेश समाजाला देतात. श्रद्धा, संयम आणि एकात्मतेची शिकवण देणारी ही परंपरा प्रत्येकाला सकारात्मकतेची प्रेरणा देते. वारी ही आपल्या सांस्कृतिक अस्मितेचा अभिमान आहे.

- विशाल चुगेरा, संस्थापक अध्यक्ष चुगेरा

आषाढी एकादशी हा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, भक्तीचा आणि अस्मितेचा सर्वात मोठा सोहळा आहे. या पवित्र पर्वावर 'पुढारी'च्या माध्यमातून 'वैकुंठीचा राया' या सुश्राव्य अभंग मैफिलीचे सहप्रायोजक होण्याचा मान सणस ग्रुपला मिळाला, हा आमच्यासाठी अत्यंत समाधानाचा आणि भाग्याचा क्षण आहे. या सोहळ्यात किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक यादवराज फड आणि सुनील पासलकर यांच्या स्वरांनी आणि ज्येष्ठ निवेदक रवींद्र खरे यांच्या निरुपणाने रंगणारी ही मैफिल पुणेकरांना एका वेगळ्याच भक्तिरसाची अनुभूती देईल, यात शंका नाही.

- सिद्धार्थ सणस, सणस ग्रुप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news