

पुणे: देवाचिये द्वारी उभा क्षणभरी... यांसारख्या ओव्यांचे अर्थ कीर्तनाद्वारे सांगण्यासह ज्ञानोबा माऊली, तुकारामच्या नामघोषाने शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक लालमहालाचा परिसर दुमदुमला. वारकऱ्यांसाठी पुण्यात सलग १२ तास अखंड कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले होते. कसबा पेठेतील लालमहाल येथे सलग ८ नारदीय कीर्तनांच्या कीर्तनमालेत समरसता आणि संतपरंपरेचे दर्शन घेण्यासाठी वारकरी भक्तांनी गर्दी केली.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, संस्कार भारती पश्चिम प्रांत आणि पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेतर्फे महाराष्ट्र शाहीर जंगम स्वामी यांच्या स्मरणार्थ सलग १२ तास अखंड कीर्तनमालेचे आयोजन केले होते.
कीर्तनमालेचे उद्घाटन लालमहालाचे सुरक्षारक्षक सोमनाथ भोंडे, अश्विनी ससाणे, तसेच पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे स्वच्छता कर्मचारी सुनील भंडगे यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथेचे पूजन करून झाले.
प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे, संस्कार भारतीचे पश्चिम प्रांत महामंत्री प्रशांत कुलकर्णी, पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड आदी उपस्थित होते.
कीर्तनमालेत अनुक्रमे कीर्तनकार श्रेयस बडवे, विकास दिग्रसकर, प्रा. संगीता मावळे, महेश काणे, वासुदेव बुरसे, डॉ. चारुदत्त आफळे, शेखर व्यास, सुहास देशपांडे यांचे कीर्तन सादर केले. संतपरंपरा, वारी, तसेच भक्तीचे महत्त्व आणि माहात्म्य कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनातून सांगितले. उपेंद्र शितुत, केदार टिळेकर, पल्लवी पिळणकर, होनराज मावळे यांनी साथसंगत केली.