Ashadhi Wari 2026 : 'विठू माऊली'च्या लेकरांसाठी यवतकरांचा मायेचा घास! दीड टन पिठलं आणि दीड लाख भाकऱ्यांची महामेजवानी!

८२ वर्षांची अखंड परंपरा, यवतमध्ये रंगला विठ्ठल भक्तांच्या तृप्तीचा सोहळा
यवत येथे वारकरी भाविकांसाठी पिठलं तयार करण्याची सुरू असलेली लगबग
यवत येथे वारकरी भाविकांसाठी पिठलं तयार करण्याची सुरू असलेली लगबग
Published on
Updated on

यवत : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या यवत मुक्कामानिमित्त यवत ग्रामस्थांनी यंदाही अन्नदानाची ८२ वर्षांची अखंड परंपरा अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात जपली. लोणी काळभोर ते यवत हा कठीण पायी प्रवास करून आलेल्या लाखो वारकरी भाविकांसाठी तब्बल दीड टन पिठलं आणि दीड लाख भाकऱ्यांची भव्य मेजवानी आयोजित करण्यात आली होती.

अन्नदानाचा लावा मेळा ।

भुकेल्यांचा भरा घास पेला ॥

अन्न पूर्णब्रह्म जाणावे ।

प्रेमे सर्वांना वाढवावे ॥१॥

दारी आला जो भुकेला ।

विठ्ठल भेटे त्या रूपाला ॥२॥

सेवाभाव अंतरी ठेवा ।

दीनजनांचा धावा घ्या ॥३॥

दानामध्ये नाही अभिमान ।

तेथे वसे श्रीनारायण ॥४॥

तृप्त झाले जेवणारे ।

आशीर्वाद देती सारे ॥५॥

तुका म्हणे सेवा खरी ।

विठ्ठल भेटे अंतरी ॥

६० किलोच्या कढई अन् घराघरांत भाकरीची लगबग

गावातील घराघरांत वारकऱ्यांसाठी भाकऱ्या तयार करण्याचे काम सुरु असतानाच, यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिर परिसरात सकाळपासूनच पिठलं तयार करण्याची लगबग सुरू होती. मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या विशाल कढईंमध्ये पारंपरिक पद्धतीने पिठलं तयार करण्यात आले.

एका कढईत सुमारे ६० किलो पिठलं बनविण्यात येत होते. त्यासाठी २० किलो बेसण तसेच सुमारे ४० किलो कांदा, मिरची, लसूण, तेल, मसाले व इतर साहित्य वापरण्यात आले. अशा एकूण १४ ते १५ कढईंमध्ये पिठलं तयार करून भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली.

तरुणाईने पेलली सेवाभावाची धुरा

या अन्नदानासाठी गावातील युवकांनी दिवसभर परिश्रम घेतले. पिठलं तयार करणे, भाकऱ्या जमा करणे, भोजन वाढणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता आणि शिस्तबद्ध नियोजन अशा विविध जबाबदाऱ्या ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने स्वीकारल्या. ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी सेवाभावाची ही परंपरा पुढे चालवत समाजासमोर आदर्श निर्माण केला.

शासकीय यंत्रणांनीही घेतला आवडीने आस्वाद

या भोजनाचा लाभ केवळ वारकरी भाविकच घेत नाहीत, तर पालखी सोहळ्यासाठी दिवसरात्र कार्यरत असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग, महसूल, ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापन तसेच विविध शासकीय यंत्रणांतील अधिकारी व कर्मचारीही या पिठलं-भाकरीचा आवर्जून आस्वाद घेतात. अनेक अधिकारी तर दरवर्षी यवतच्या या गावरान पिठलं-भाकरीची आतुरतेने वाट पाहत असतात.

मागील वर्षापेक्षा वाढीव सोय

मागील वर्षी एक टन पिठलं आणि एक लाख भाकऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, यंदा पिठलं-भाकरीच्या भोजनासाठी भाविकांची वाढलेली मागणी लक्षात घेऊन त्यामध्ये वाढ करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news