

जेजुरी : पंढरीशी राही रखुमाई, येथे म्हाळसा बानाई!
जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय मल्हार, जय मल्हार!!
तेथे विटेवर आहे उभा, येथे घोड्यावरी शोभा!
हो तेथे अबिराचे आहे लेणे, येथे भंडार भूषणे!!
तेथे मृदंग वीणा टाळ, येथे वाघ्या मुरळीचा घोळ!
तेथे आहे चंद्रभागा, येथे जटी वाहे गंगा!!
तेथे कटेवरी कर, येथे धरीली समशेर!
तेथे पुंडलिक जाण, येथे हेगडी प्रधान!!
तेथे दहीहंडी फुटती, येथे लंगर तुटती!.
तुका म्हणे एकची पायी, विठू खंडू दुजा नाही!!
संत तुकाराम यांनी आपल्या अभंगात पांडुरंग आणि खंडोबा हे दुजा नाहीत तर एकसारखे आहेत, असे वर्णन केले आहे. अशा ओवी गात... नाचत... सदानंदाचा येळकोट... येळकोट, येळकोट...जय मल्हार असा जयघोष करीत वैष्णवांचा मेळा खंडोबा देवाच्या जेजुरीनगरीत प्रवेशला. या वेळी जेजुरी नगरपालिका, जेजुरी देवसंस्थान व ग्रामस्थांच्या वतीने देवाचे लेणं असणारा भंडार उधळून माउली व वैष्णवांचे स्वागत केले.
मंगळवारी (दि. २४) सासवड -जेजुरीची वाट वैष्णवांनी फुलून गेली होती. अभंगाच्या ओवीला टाळ -मृदंगाची साथ, खांद्यावर भगवी पताका आणि डोक्यावर तुळशी वृंदावन, पायांना लागलेली विठू-माउलीची ओढ आणि वाटेवरचा असणाऱ्या कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनाची ओढ घेऊन भाविक रस्ता चालत होते. मंगळवारी पहाटेपासूनच कुठे जोरदार तर कुठे रिमझिम पावसाच्या सरी पडत होत्या. सकाळी बोरावके मळा येथील न्याहारी, नंतर दुपाई यमाई शिवरी येथील आदिशक्ती यमाईमातेचे दर्शन, शिवरीकरांचे स्वागत व भोजन उरकून दुपारी पालखी सोहळा मल्हारी भेटीसाठी मार्गस्थ झाला.
खांद्यावर भगवी पताका, ओठी ज्ञानोबा -तुकोबारायांची ओवी गात, टाळ -मृदंगाच्या साथीने नाचत, वैष्णव जेजुरीकडे निघाले. जेजुरी जवळ येताच व जेजुरीचा गड दिसताच 'येळकोट...येळकोट जयमल्हार', 'सदानंदाचा येळकोट' असा गजर वैष्णवांच्या दिंड्यामधून होत होता. अनेक दिंड्यांनी खंडोबा देवाची गाणी, अभंग म्हणत देवाचा जयजयकार केला. 'वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी' या संत एकनाथांच्या ओवी म्हणत दिंडी मल्हारीच्या सुवर्णनगरीत दाखल झाल्या. 'मल्हारी पिवळा झाला हळद लागली, लागली बाणाई तुला' असे गाणे म्हणत एका दिंडीतील महिला व पुरुषांनी भंडाराची उधळण करीत रस्त्यावर फेर धरून जल्लोष केला.
सायंकाळी ५ वाजता पालखी सोहळ्याने जेजुरीनगरीत प्रवेश केला. रस्त्यावर आकर्षक रांगोळी घालण्यात आली होती. कडेपठार कमानीजवळ जेजुरी नगरपालिका, जेजुरी देवसंस्थान व नागरिकांनी माउलींच्या रथाचे, पालखी सोहळ्यातील दिंड्यांचे व वैष्णवांचे भंडारा उधळत स्वागत केले.
सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जेजुरी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या व ऐतिहासिक होळकर तलावाकाठी असणाऱ्या शासकीय ९ एकराच्या भव्य पालखीतळावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा विसावला. समाजआरती झाल्यानंतर सोहळ्यात सहभागी झालेला वारकरी आपापल्या तंबूकडे रवाना झाले. त्यानंतर जेजुरी व परिसरातील हजारो भाविकांनी रात्री ११ वाजेपर्यंत रांगा लावून माउलींचे दर्शन घेतले. रात्री उशिरपर्यंत स्थिरावलेल्या दिंड्यामधून भजन-कीर्तन तर कुठे भारुडाचे स्वर आळवले जात होते. आज दिवसभर हजारो वारकरी बांधवांनी जेजुरी गड व कडेपठार गडावर जाऊन कुलदैवत खंडोबा देवाचे दर्शन घेतले.
पालखी सोहळ्याचा बुधवारी (दि. २५) मुक्काम वाल्मिकी ऋषींचे समाधीस्थळ असलेल्या वाल्हे गावी असणार आहे. या सोहळ्यानिमित्त पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जेजुरी नगरपालिका, ग्रामीण रुग्णालय यांनी विविध सुविधा पुरविल्या.