महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणार्या जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाला जेजुरी गडावर प्रारंभ झाला असून, करवीर पीठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती यांच्या हस्ते श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्तींची घटस्थापना करण्यात आली.
सोमवारी (दि. 2) श्री खंडोबा मंदिरात देवाची पूजा अभिषेक झाल्यानंतर उत्सवमूर्तींची वाजतगाजत मिरवणूक काढून मूर्ती रंगमहालात आणण्यात आली. करवीर पीठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती, देवसंस्थानचे विश्वस्त, पुजारी, सेवकवर्ग व ग्रामस्थांच्या वतीने पूजा करून घटस्थापना करण्यात आली. या उत्सवानिमित्त गडावर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापनेनिमित्त हजारो भाविकांनी श्री खंडोबा देवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते, विश्वस्त अॅड. पांडुरंग थोरवे, मंगेश घोणे, पोपटराव खोमणे, डॉ. राजेंद्र खेडेकर, विश्वास पानसे, माजी विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, सुधीर गोडसे, नितीन राऊत, जय मल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठानचे गणेश आगलावे, प्रशांत सातभाई, बाळकृष्ण दीडभाई, हनुमंत लांघी, तसेच गुरव, घडशी, कोळी, वीर सामाजाचे पुजारी, सेवकवर्ग उपस्थित होते. या उत्सवाचे पौरोहित्य वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी यांनी केले.
चंपाषष्ठीबाबत असलेले महात्म्य
महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाच्या वर्षाकाठी आठ यात्रा भरतात. दरवर्षी 50 लाखांहून अधिक भाविक येथे देवदर्शनासाठी येतात. खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाला धार्मिक महत्त्व आहे. पौराणिक काळात मनी आणि मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी श्रीमहादेवाने खंडोबाचा अवतार घेऊन दैत्यांशी युद्ध केले. सहा दिवस युद्ध करून दैत्यांचा पराभव करून विजय मिळविला. या विजयाचे प्रतीक म्हणून पौराणिक काळापासून जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सव साजरा केला जातो.