

विठ्ठल गावडे पारवाडकर
Goa Warkari Groups
पणजी : राम कृष्ण हरी जय जय पांडुरंग हरी, विठ्ठल विठ्ठल गजरी, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंट चंद्रभागेच्या काठी डाव मांडला, श्रीराम जय राम जय जय राम अशा विविध गजराने सध्या गोमंतक दुमदुमत आहे. कारण आहे आषाढीसाठी पंढरपुरकडे पायी चाललेल्या वारींचे, राज्यभरातून 41 मंडळाच्या वारी सावळ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे गेले दोन दिवस रवाना झाल्या असून सुमारे 45 हजार वारकरी पायी चालत जाताना विठूनामाचा गजर करीत रस्त्यावरून जात आहेत. सोबत संत तुकाराम, संत ज्ञानदेव आदीं संताच्या पालख्या घेऊन ही भक्त मंडळी सुमारे 15 ते 17 दिवस चालत पंढरपुरला जाणार आहेत.
या पायी वारीमध्ये ज्येष्ठांसह बाल व सरकारी अधिकार्यासह शेतकरी व महिलांचा सहभाग दिसून येत असून विठ्ठलाच्या भक्तीच्या जोरावर आपण पंधरा दिवसाची वाट चालून विठ्ठलाच्या पायी पोचणार असा विश्वास या वारकऱ्यांना आहे. दरवर्षी या पथकामध्ये दोन ते तीन नव्या पथकांची भर पडत आहे. पुर्वी माशेल, मुळगाव येथील अवघीच वारकरी पथके पायी पंढरपुरला जात होती. मात्र आता गोवाभरातील मंडळ पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायी जाताना दिसत आहे. भगवे झेंडे खांद्यावर घेऊन हरिनामाचा गजर करत भाविक पुढे जात आहेत.
दक्षिण गोव्यातून निघालेली पथके दोन दिवस अगोदर निघतात तर केरी साखळी परिसरातील पथके उद्या दि.22 रोजी निघणार आहेत. एका पथकामध्ये कमीत कमी 70 व जास्तीत जास्त 200 भाविक सहभागी होत असल्याने पंढऱपुरकडे पायी जाणार्या वारकर्यांची संख्या 44 ते 45 हजाराच्या घरात भरते. गोव्यातून पंढरपूरला जाण्यासाठी काही वारकरी पथके साखळी केरी चोर्लाघाट मार्गे चंदगड पंढरपूर असा प्रवास करतात तर काही वारकरी मंडळे दोडामार्ग तिलारी घाट मार्गे जातात.
अनेक वर्षे एकाच मार्गाने जाणार्या वारकरी पथकांचे रात्रीचे स्थान ठरलेले असते. सदर गावातील गावकरी या वारकरी पथकाचे स्वागत करतात तेथे भजन कीर्तन होते, रात्री महाप्रसाद होतो. पहाटे उठून पुन्हा पुढच्या टप्पा गाठण्यासाठी हे वारकरी मंडळ पायी पुढे जातात. ऊन पावसाची तमा न करता फक्त विठ्ठल भेटीची ध्यास घेऊन सर्वजन चालत जातात. सर्व पथकासोबत एक दोन मोठी वाहने असतात त्यात सामान, कपडे ठेवले जातात. येताना या वाहनातून काही वारकरी येतात तर बहुतांश बसने परततात.
मुरगाव वारकरी संस्था संभाजीनगर वास्को ची पायी वारी शुक्रवारी सकाळी 11 च्या दरम्यान खांडोळा येथे पोहचली. ही वारी काल दि.20 रोजी वास्कोहून रवाना झाली होती. ही वारी दि.6 रोजी पंढरपुरला पोहचेल. अशी माहिती पथकाचे प्रमुख दिलीप मालवणकर यांनी दिली.
काणकोन येथून सभापती आणि आमदार रमेश तवडकर यांनी दोन पालख्यांना हिरवा झेंडा दाखवला एक पालोळे येथून आणि दुसरी राजबाग येथून, यावेळी तवडकर यांनी जीवनातील अनिश्चितता संपवण्याचे बळ भक्तीत असल्याचे सांगितले. तर माजी आमदार विजय खोत यांनी मुख्यमंत्र्यांनी 416 किमी लांबीच्या पायी वारीच्या मार्गावर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. काणकोनातील सुमारे 250 भक्त 19 दिवस चालत जातील.
वास्कोमध्ये, आमदार कृष्णा साळकर हे भगवान दामोदर मंदिरात मुरगावच्या वारकर्यांमध्ये सामील झाले. येथील वारकरी 15 दिवसांचा, 500 किमीचा प्रवास करणार आहेत. वृद्ध भक्त आणि दुसर्या वर्षी परतणारा माउली नावाचा कुत्रा यांचा या पथकात समावेश आहे.
सर्वात पूर्वी पायी चालत जाणाऱे पथक असलेल्या माउली वारकरी मंडळ मुळगावचे अध्यक्ष उदयबुवा फडके यांनी सांगितले की, यावर्षीच्या यात्रेत 41 दिंड्या सहभागी होत आहेत.
फोंडा येथे प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी माशेल येथील देवकी-कृष्ण मंदिरातील 100 हून अधिक वारकर्यांच्या वारी पथकाला नारळ फोडून झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी शेतकरी कष्टकरी समाजातील लोक आषाढी एकादशीला भक्तिमय वातावरणात पंढरपुरला जात आहेत. विठ्ठलाने त्यांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात अशी प्रार्थना केली.