Ashadhi wari 2023 : माउलींची पालखी अलंकापुरीत; भक्तिमय वातावरणात आळंदीत आनंदोत्सव

Ashadhi wari 2023 : माउलींची पालखी अलंकापुरीत; भक्तिमय वातावरणात आळंदीत आनंदोत्सव

श्रीकांत बोरावके

आळंदी(पुणे) : आळंदीच्या वेशीकडे भाविकांची लागलेली नजर अन् टाळ-मृदंगाचा शिगेला पोचलेला गजर… अशा भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी साधारण एक महिन्याचा पायी प्रवास करीत पंढरीच्या विठुरायाची भेट घेऊन बुधवारी (दि. 12) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अलंकापुरीत परतली. माउलींच्या पालखीचे आळंदीकरांनी जंगी स्वागत केले.
पालखीसह शेकडो वारकरी व भाविकांसोबत टाळ-मृदंगाचा गजर करीत संतजनांचा मेळा बुधवारी (दि. 12) अलंकापुरीत दाखल होणार असल्यामुळे पालखी मार्गावर रस्त्यांच्या दोन्ही बाजूस स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते.

महाद्वार चौक, नगरपालिका चौकात रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. नागरिकांच्या वतीने माउलींच्या पालखीवर फुलांची उधळण केली जात होती. पालखी वडमुखवाडी परिसरात आल्याचा निरोप आळंदी मार्गावरील भाविकांना समजताच भाविकांनी पालखीच्या स्वागतासाठी पायी चालत जाऊन स्वागत केले. पोलिस प्रशासनाच्या वतीने मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालखी नगरपालिका चौक, इंद्रायणी घाट मार्गे, हरिहरेंद्र मठ, महाद्वारातून मंदिरात विसावली. पालखीचे मंदिर परिसरात आगमन होताच येथेही भाविकांनी जोरदार स्वागत केले. त्यानंतर पालखीची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली.

दृष्ट लागण्या जोगे सारे…

वैभवी पायी वारी पालखी सोहळा पूर्ण करीत बुधवारी माउली आळंदीत परतले. त्यांच्या या संपूर्ण प्रवासानंतर ते आळंदीत दाखल होताच त्यांना दृष्ट लागू नये, या श्रध्येय भावनेने त्यांची दही-भात व त्यावर गुलाल टाकत नारळ उतरून टाकत दृष्ट काढण्यात आली. त्यानंतर पालखी आळंदीत दाखल झाली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news