Ashadhi wari 2023 : ‘त्या’ बनल्या एकमेकींच्या ऊर्जा
पुणे; पुढारी वृत्तसेवा : कंबरेत वाकलेल्या; पण दांडगा उत्साह असणार्या 83 वर्षांच्या सत्यभामा कुलकर्णी आणि त्यांची मुलगी अमृता यांनीही पालखी सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्या दोघीही एकमेकींच्या ऊर्जा बनत सोहळ्यात पायी चालल्या. उतारवयातही आईला वारीत घेऊन आलेल्या अमृता यांच्या डोळ्यांत आईचा उत्साह पाहून पाणी आले.
त्या आईविषयी भरभरून बोलत होत्या. अमृता म्हणाल्या, 'आळंदी ते पुणे असा आईने या वयातही चालत प्रवास केला. मी आळंदीत राहते, ती माझ्याकडे आदल्या दिवशी आली आणि आम्ही पहाटे एकत्र आळंदी ते पुणे असा संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात पायी प्रवास केला. आईला पाहून माझ्यातही ऊर्जा संचारली आणि मी तिच्यासोबत हा प्रवास करू शकले.
इच्छाशक्ती असेल तर आपण काहीही करू शकतो, हे आईला पाहून वाटले. तर सत्यभामा म्हणाल्या, 'मी बर्याच वर्षांपासून पालखीत सहभागी होत आहे. श्री विठुमाउलीला भेटण्याची आस मला इथे घेऊन येते. खूप आनंद मिळतो, उतारवयातही जगण्यासाठी आशा मिळते. यंदाही तोच उत्साह कायम ठेवून सोहळ्यात पायी चालले. ही अनुभूती काही औरच होती.'
हेही वाचा