Ashadhi wari 2023 : ‘जी-20’च्या पाहुण्यांनीही अनुभवला सोहळा
पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'जी-20' परिषदेसाठी शहरात आलेल्या परदेशी पाहुण्यांनी सोमवारी महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा 'याचि देही याचि डोळा' अनुभवला. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ केलेल्या खास दालनातून वैष्णवांचा सोहळा पाहण्यासोबतच काहींनी टाळ-मृदंगाच्या तालावर ठेकाही धरला. शहरात विविध देशांच्या प्रतिनिधींची 'जी-20' परिषद सोमवारपासून सुरू झाली.
परिषदेच्या पहिल्याच दिवशी शहरात पालखी सोहळा दाखल झाला. हा सोहळा परदेशी पाहुण्यांना अनुभवता यावा, यासाठी महापालिकेच्या वतीने संत तुकाराम महाराज पादुका मंदिराजवळ फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वावर खास व्यवस्था करण्यात आली होती. पालकमंत्री पाटील यांनी परिषदेच्या प्रतिनिधींचे स्वागत केले. या वेळी पोलिस आयुक्त रितेश कुमार, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदी उपस्थित होते.
ढोल-ताशांच्या गजरात आणि तुळशीमाळा, वारकरी उपरणे, टोपी घालून प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. वारकर्यांच्या हाती भगव्या पताका, महिला वारकर्यांच्या डोक्यावर तुळशीची रोपे, कपाळाला टिळा, टाळ, मृदंग, वीणावादनात, 'राम कृष्ण हरी', 'ज्ञानोबा माउली तुकाराम' जयघोषात, अभंगगायनात, फुगडी, नर्तनात दंग वारकरी पाहून परिषदेचे प्रतिनिधी भारावून गेले. काही प्रतिनिधींनी वारकर्यांकडून कपाळाला टिळा लावून घेत ढोल-ताशा आणि टाळ-मृदंगाच्या तालावर ठेका धरला.
याशिवाय वारकर्यांसोबत फुगडीचा फेर धरला. महिला प्रतिनिधींनी डोक्यावर तुळशीची रोपे घेतली. सर्वजण आपल्या मोबाईलमध्ये पालखी सोहळा टिपत होते. दिंड्यांच्या शिस्तबद्ध रांगा पुढे सरकत असताना श्री संत तुकाराम महाराज पालखीचे आगमन झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील पालखीच्या दर्शनासाठी गर्दीतून पुढे जाऊ लागताच काही परदेशी प्रतिनिधींनीही पालखीचे दर्शन घेतले.
हेही वाचा

