

Mauli Palkhi at Valmiki Nagar
वाल्हे :
नाम गाऊ नाम घेऊ।।
नाम विठोबाला वाऊ।।
आमि दहिवाचे दहिवाचे दास पंढरीरायाचे।।
ही भावना मनी ठेवून कपाळी बुक्का, गंध लावून खांद्यावर भगव्या पताका उंचावत लाखो वैष्णवांनी टाळ-मृदंगांच्या गजरात आद्य रामायणकार महर्षी वाल्मीकी ऋषींच्या वाल्हेनगरीत (ता. पुरंदर) माउलींचा पालखी सोहळा विसावला. 'ज्ञानोबा-तुकाराम'चा जयघोष करीत आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान आद्य रामायणकारांच्या वाल्हेनगरीत बुधवारी (दि. २६) वैष्णवांचा अलोट महासागर लोटला होता.
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीनगरीचा निरोप घेऊन पहाटे सहाच्या सुमारास टाळ-मृदंगांचा गजर व हरिनामाच्या जयघोषामध्ये पालखी सोहळा वाल्हेनगरीकडे मार्गस्थ झाला. सकाळी साडेदहाच्या सुमारास दौंडज ग्रामपंचायतीच्या वतीने व ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. दुपारी ११.४० वाजेच्या सुमारास पालखीचा नगारखाना व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वाल्हेनगरीच्या वेशीवर दाखल झाला. या वेळी वाल्हेचे सरपंच अतुल गायकवाड, वागदरवाडीचे सरपंच सुनील पवार, बजरंग पवार, माजी सरपंच अमोल खवले, दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, सागर भुजबळ, प्रवीण कुमठेकर, पिंगोरीचे माजी सरपंच जीवन शिंदे, प्रकाश शिंदे, अतुल नाझरे, सचिन देशपांडे, प्रा. संतोष नवले, संतोष भुजबळ, उद्योजक गोरख कदम, शंकर भुजबळ आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि तरुणांनी पुष्पवृष्टी करीत "माउली माउली"चा जयघोष करीत जोरदार स्वागत केले.
स्वागतानंतर पोलिस प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजनामुळे एक तासाच्या आत सुकलवाडी फाट्याजवळील पालखीतळावर हा सोहळा पोहोचला. रथामधून पालखी काढून ग्रामस्थांच्या खांद्यावर देण्यात आली. ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन नाचवत पालखी विसाव्याला प्रदक्षिणा घातली. चोपदारांनी सूचना केल्यानंतर वैष्णवांच्या उपस्थितीत समाज आरती झाली. आरतीनंतर भाविकांनी दुतर्फा रांगा लावून माउलींचे दर्शन घेण्यास सुरुवात केली.
यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, पुरुषोत्तमदादा पाटील, कबीर महाराज, ॲड. रोहिणी पवार, बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदींसह उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम रजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ, जेजुरीचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे, मंडल अधिकारी भारत भिसे, ग्रामविकास अधिकारी जयेंद्र सूळ आदींसह पुरंदर तालुक्यातील अनेक प्रशासकीय अधिकारीवर्ग उपस्थित होते.
दरम्यान, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा गुरुवारी (दि. २६) सकाळी साडे सहा वाजता निरा स्नानासाठी मार्गस्थ होणार असून, संध्याकाळी लोणंद येथे मुक्कामी जाणार आहे.
वाल्हे गावची श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची परंपरा असलेली ग्रामप्रदक्षिणा आळंदी देवस्थानकडून मागील काही वर्षांपासून पालखीतळावर पोहचण्यास उशीर होत असल्याचे तसेच दुपारच्या जेवणाचे कारण देत बंद करण्यात आली आहे. यावर्षी पालखी सोहळा लवकरच महर्षी वाल्मीकी विद्यालयाजवळ सकाळी ११.४० वाजताच पोहचला होता. यावर्षीही ग्रामप्रदक्षिणा झाली नसल्याने ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर व्यक्त होत होता. पुढील वर्षी पालखी महामार्गाचे काम पूर्णत्वास जाईल व या वर्षापेक्षाही पुढील वर्षी पालखी सोहळा लवकर वाल्हे गावच्या वेशीवर पोहचेल असा अंदाज वर्तवीत वाल्हे गावची ग्रामप्रदक्षिणा सुरू होईल, अशी आशा ग्रामस्थांना आहे.