

Palkhi ceremony from water: A unique devotional experience at Shrikshetra Nrusinghwadi Datta Temple
कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा
कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे श्रीक्षेत्र नृसिंहवाडी ता. शिरोळ येथील श्री.दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात नदीचे पाणी आले. यामुळे दररोज होणारा पालखी सोहळा आज पाण्यातूनच संपन्न झाला. भाविकांसाठी हा एक विलक्षण आणि भक्तिमय अनुभव ठरला.
दररोज दत्त मंदिरात पूजेनंतर नित्यनेमाने निघणारी श्री दत्त महाराजांची पालखी आज नदीच्या पाण्यातून नेण्यात आली. मंदिर परिसरात पाणी आल्याने संतमंडळी, मंदिराचे सेवेकरी आणि भाविक पालखीला पाण्यातूनच घेऊन गेले. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि "दत्त दत्त जय जय दत्त" च्या जयघोषात पालखी फेरी पूर्ण केली. या प्रसंगी मंदिर समितीने आवश्यक खबरदारी घेतली होती. भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन स्वयंसेवकांची नियुक्ती केली होती.
दरम्यान पाणी पातळीत सायंकाळ पासून आणखीन वाढ झाल्याने मंदिरात चढता दक्षिणद्वार सोहळा होण्याची दाट शक्यता आहे.पूरपरिस्थितीतही भक्तांच्या मनोभावांना आणि दत्तप्रेमाला उधाण आलेले दिसून आले.
या घटनेमुळे भाविकांमध्ये एक वेगळा भक्तीरूप उत्साह निर्माण झाला असून, काही भाविकांनी याला "निसर्गाशी एकरूप झालेली भक्ती" असे वर्णन केले. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी हे दत्तभक्तांचे प्रमुख तीर्थक्षेत्र असून, येथील प्रत्येक धार्मिक सोहळा भाविकांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. आजचा पाण्यातून झालेला पालखी सोहळा भक्तांच्या श्रद्धेचा आणि निष्ठेचा जणू साक्षात प्रत्यय देणारा भक्तिमय अनुभव ठरला.