

Arun Gawli PA extortion case
पुणे: नामांकित बिल्डरला कुख्यात गँगस्टर अरुण गवळी यांचा पीए बोलत असल्याचे सांगत पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लष्कर पोलिस आणि गुन्हेशाखेच्या खंडणीविरोधी पथक 1, युनिट 4 च्या पथकाने सापळा रचत चौघा आरोपींना विमाननगर येथील एका हॉटेलमधून बेड्या ठोकल्या.
रोहन शिवाजी गवारे (30, रा. शीतल अपार्टमेंट, कवडेवाडी, कोरेगाव पार्क), सुदर्शन आसमानराव गायके (27, रा. महादेव मंदिरासमोर, महानगर 1, वाळुंज, संभाजीनगर) महेंद्र रामनाथ शेळके (42, रा. शाहुनाथनगर, बीड) आणि कृष्णा परमेश्वर बुधनर (26, हनुमान मंदिराजवळ, खामगाव, जि. बीड) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. याबाबत बांधकाम व्यावसायिक कार्ज मोंटेरो यांनी लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. (Latest Pune News)
तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक आहेत. ते मागील बारा वर्षांपासून कंपनीमार्फत छोटी मोठी कन्स्ट्रक्शनची कामे करतात. सुमित चौरे हा फिर्यादीचा पूर्वीचा व्यावसायिक भागीदार होता. दोघांमध्ये हॉटेल व्यवसायासंबंधी गंभीर आर्थिक वाद सुरू असून, तो सध्या न्यायालयात प्रलंबित आहे.
या वादातूनच आरोपींनी खंडणी उकळण्याचा कट रचला. सुमीत चौरे आणि त्याचे दोन साथीदार यांनी एका अज्ञात क्रमांकावरून फिर्यादी बिल्डरला फोन करून अरुण गवळी यांचा खासगी सहाय्यक (पीए) प्रशांत पाटील बोलत असल्याचे त्यांनी सांगितले. सुमीत चौरे याचा मावसभाऊ सुदर्शन गायके असे सांगितले. सुमीत चौरे याच्याशी झालेल्या व्यवहाराबाबत सुदर्शन गायके याचा काहीही संबंध नसताना त्याच्याशी बोलण्यास सांगितले. तसेच तडजोड करण्यास सांगितले.
दरम्यान 9 ऑगस्टला तक्रारदारांना महेश अरुण गवळी नावाने फोन करण्यात आला. शिवीगाळ करत त्यांना 7 कोटींची खंडणी मागण्यात आली. त्यानंतर लगेश गायके याचा फोन आला. त्याने कमीत कमी पाच कोटी देऊन मॅटर सेटल करण्यासाठी दबाव टाकला. दि. 11 ऑगस्ट रोजी तक्रादारांना पाच कोटी रुपये विमाननगर येथील हॉटेलमध्ये घेऊन येण्यास सांगितले.
त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर ते निर्मल मखिजा, रवींद्र पाटील, रिषु बवेजा यांच्यासोबत हॉटेलमध्ये गेले. त्या वेळी आरोपींनी पाच कोटी दे नाही तर जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. त्या वेळी सापळा रचलेल्या पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.