खडकवासला: जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणार्या राजगड, पश्चिम हवेली आणि वरसगाव-मोसे खोर्यात पावसाने ओढ दिली आहे. ओढे-नाले कोरडे पडले असून, भातखाचरेही कोरडी ठणठणीत झाली आहेत. परिणामी, तब्बल 8 हजार हेक्टर क्षेत्रातील भातपिक धोक्यात आली असून, शेतकरी चिंतेत आहेत.
राजगड तालुक्यात यंदा 5 हजार हेक्टर क्षेत्रावर, पश्चिम हवेली तालुक्यात 2 हजार 500 हेक्टरवर आणि वरसगाव-मोसे खोर्यात 500 हेक्टरवर भात लागवड झाली आहे. सुरुवातीला लागोपाठ दोन महिने पाऊस चांगला पडल्याने रोपांची उगवण झाली. मात्र, गेल्या 10 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने ओढे-नाले व डोंगरकडे कोरडे पडले, तर खाचरातील पाणी आटू लागले. परिणामी, माळरानावरील भातपिके पिवळी पडत आहेत. (Latest Pune News)
हवेली तालुक्याच्या पश्चिम भागातील सिंहगड, खानापूर, मोगरवाडी, खामगाव मावळ, आंबी वरदाडे, मांडवी जांभली, सांगरुण, कल्याण आदी भागांतदेखील भातपिकांची पावसाअभावी गंभीर स्थिती झाली आहे. या गंभीर स्थितीत शेतकरी नदी, विहिरीतील पाणी पंपाने उपसून पिके वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत.
सिंहगड विभागाचे कृषी पर्यवेक्षक विश्वजित सरकाळे म्हणाले, ‘पश्चिम हवेलीतील पिकांची पाहणी करून शेतकर्यांशी संवाद साधला जात आहे.आंबी येथील पुणे जिल्हा काँग्रेस सहकार आघाडीचे अध्यक्ष लहू निवंगुणे म्हणाले की, भात हा येथील शेतकर्यांचा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत आहे.
मात्र, पाण्याचा साठा न झाल्याने खाचरे कोरडी पडली आहेत. पावसाअभावी पिके वाया जाण्याची शक्यता आहे. वेल्हे बुद्रुक येथील शेतकरी रामभाऊ राजीवडे म्हणाले की, ’दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सुमारास धो-धो पाऊस पडतो. यंदा मात्र चार दिवसांवर सण आला, तरी पाऊस नाही.’
यंदा राजगड तालुक्यात 5 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर लागवड अपेक्षित होती. मात्र, रोपांचा तुटवडा व कमी पावसामुळे 5 हजार हेक्टरवरच भातलागवड झाली. पावसाचा अभाव कायम राहिल्यास पिकांची स्थिती आणखी गंभीर होईल.
- सुनील ईडोळे पाटील, कृषी अधिकारी, राजगड तालुका