

Harmony Organics Pvt Ltd blast
कुरकुंभ: कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक क्षेत्रातील हारमोनी ऑरगॅनिक्स प्रा. लि कंपनीत भीषण स्फोट झाला. ही घटना मंगळवारी (दि. १२) रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. स्फोटाच्या धमाक्याने पुन्हा एकदा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या गंभीर घटनेत कोणतीही जिवीतहानी व गंभीर जखमी झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार यामध्ये दोन ते तीन कामगारांच्या डोळ्यांना त्रास झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हारमोनी ऑरगॅनिक्स प्रा. लि कंपनीत मंगळवारी (दि. १२) रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास प्रक्रिया सुरू असताना टाकीचा भयानक स्फोट झाला. या दरम्यान आग लागली नसल्याने मोठी जीवीतहानी टळली. स्फोट झाल्यानंतर केमिकलच्या वाफेमुळे दोन ते तीन कामगारांच्या डोळ्यांना त्रास झाल्याने त्यांना उपचारासाठी दौंड येथील खाजगी रूग्णालयाय दाखल केले होते. (Latest Pune News)
मात्र, त्यांची नावे समजू शकली नाही. घटनास्थळी अग्नीशामन बंब दाखल झाला होता. स्फोटाची तीव्रता अधिक होती. स्फोटात घटनास्थळावरील टाकीचे झाकन व काही भाग उडून पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या पलिकडे जाऊन पडले होते. घटनेची माहिती मिळताच नागरीकांनी कंपनीकडे धाव घेतली. स्फोटात चार ते पाच कामगार भाजले असून त्यांना उपचारासाठी दौंड पाठविण्यात आल्याची अफवा पसरली होती. या स्फोटामुळे पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण झाले आहे.