सासवड: पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी सासवड नगरपरिषदेने माझी वसुंधरा 6.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2025 अंतर्गत गणपती विसर्जन करण्यासाठी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम तलावांची तसेच तीन ठिकाणी मूर्ती संकलन केंद्राची व्यवस्था केली आहे.
सासवड शहरातील सोपानदेव मंदिर, संगमेश्वर मंदिर, वटेश्वर मंदिर या ठिकाणचा समावेश आहे. तसेच कृत्रिम तलाव व निर्माल्य संकलन कलश यांची निर्मिती केली आहे. या संकल्पनेला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. गणेश विसर्जनावेळी भाविकांकडून दिवसभरात 185 गणेशमूर्ती नगरपालिकेस दान करण्यात आल्या. (Latest Pune News)
नागरिकांकडून निर्माल्य इतरत्र न टाकता निर्माल्य कलशामध्ये टाकण्यात आले. या दिवसांमध्ये निर्माण झालेल्या 1.5 टन निर्माल्य नगरपरिषदेमार्फत संकलन करून घनकचरा प्रकल्पावर प्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. निर्माल्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात असल्याने नदी, विहिरींमध्ये हे निर्माल्य न जाता जलप्रदूषण कमी करण्यास मदत होत आहे.
गणेशमूर्ती दान करा
गणेशोत्सव हा सण नागरिकांनी पर्यावरणपूरक म्हणून साजरा करावा. यामध्ये श्रींच्या जास्तीत जास्त मूर्ती दान कराव्यात. पर्यावरण समतोल राखण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी केले.
सासवड शहरात गणेशमूर्तींचे विसर्जन नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावांमध्येच करा. शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्तींचा अधिकाधिक वापर करा. पाण्याचे व इतर नैसर्गिक स्रोतांचे संरक्षण हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. विसर्जनस्थळी स्वच्छता राखा व प्लास्टिकचा वापर टाळा.
- डॉ. कैलास चव्हाण, मुख्याधिकारी, सासवड नगरपरिषद