विद्यार्थ्यांच्या सुयोग्य व्यक्तिमत्त्वाचा विकास घडून यावा, यासाठी त्या कलांचे शिक्षण घेणे आवश्यक ठरते. स्वयंशिस्त, आत्मसंतुलन, संवेदनशीलता, राष्ट्रीय एकात्मता, सामूहिक भावना इत्यादी समाजाभिमुख गोष्टी या कलेद्वारे सहजपणे अंगी बाणवता येतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन त्याचे आयुष्य धकाधकीच्या तणावपूर्ण, स्पर्धात्मक युगात कोमेजून न जाता आनंददायकरीतीने व्यतीत व्हावे, हा मूलभूत विचार अभ्यासक्रमात केला गेला आहे. कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक विविध स्तरांतून आलेल्या विद्यार्थ्यांना एका समपातळीवर आणून उदात्त असा जीवनानुभव देणे, हा उद्देश आहे. कला अध्ययनाशी तादात्म्य पावल्यावर लिंग, जात, धर्म या सर्व गोष्टी विसरून सामूहिक भावना वाढीला लागते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचा विकास होण्यासाठी हा पाठ्यक्रम पूरक ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.