

पुणे : पुढारी वृत्तसेवा
शस्त्र परवाना मिळवण्यासाठी पुणे पोलिसांना वास्तव्याची बनावट कागदपत्रे सादर करून परवाना मिळवल्याप्रकरणी वैष्णवी हगवणे यांचा पती शशांक आणि दीर सुशील हगवणे विरोधात रात्री उशिरा वारजे आणि कोथरूड पोलिस ठाण्यात फसवणुकीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू झाल्यानंतर हगवणे बंधूंविरोधात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. याबाबत कोथरूड आणि वारजे पोलिस ठाण्यातील पोलिसांनी फिर्यादी दिली आहे.
हगवणे बंधूंचा कायमस्वरुपी निवासाचा पत्ता पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असूनही पुण्यात निवास असल्याचे दाखवून त्यांनी पिस्तुल परवाना घेतल्याचे समोर आले होते.
त्यानंतर पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली होती. दोघांनी पोलिसांची दिशाभूल केल्याचे निष्पन्न झाल्यास दोघांवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोघांनी पुणे आयुक्तालयातील वारजे आणि कोथरूड पोलिस ठाण्यांतर्गत त्यांनी परवान्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर त्याची पडताळणी करून त्यांना परवाना देण्यात आला. यासाठी त्यांनी पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत वास्तव्यास असल्याचा पुरावा म्हणून भाडेकरार दिल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले होते.
हगवणे बंधूंनी पौड पोलिसांकडे पिस्तुल परवान्यासाठी अर्ज केला होता. तत्कालीन पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी त्यांना परवाना नाकारला होता. त्यानंतर त्यांनी पुणे पोलिस आयुक्तालयात अर्ज केला. अर्जासोबत सादर केलेला भाडेकरार केवळ दोन महिने जुना होता, असे पोलिसांना दिसून आले होते.