

पुणे : हवेचे दाब वाढल्याने राज्यातील मान्सूनने क्षणभर विश्रांती घेतली आहे. बुधवारपर्यंत त्याने 50 टक्के राज्य व्यापले. मात्र, तो आता मराठवाडा अन् विदर्भात प्रवेश करताच मंदावला आहे. राज्यात सहा जूनपर्यंत मोठ्या पावसाचा अंदाज नाही, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात यंदा मान्सूनने 10 दिवस आधीच जोरदार मुसंडी मारत विक्रमी वेळेत 25 मे रोजी आगमन केले. 26 रोजी तो मुंबई, पुणे, सोलापूरसह अहिल्यानगरपर्यंत पोहचला, तर 27 रोजी त्याने मराठवाडा, विदर्भात प्रवेश केला. मात्र, तो त्या दोन्ही विभागांच्या वेशीवरच थांबला. कारण, हवेचे दाब अचानक वाढले. त्यामुळे पाऊस अन् मान्सूनचा प्रवासही महाराष्ट्राच्या मध्यावर थांबला आहे.
बांगलादेशच्या किनारपट्टीवर गुरुवारी दुपारी कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने ईशान्य भारतातील पाऊस वाढणार आहे. त्याचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नाही. मात्र, तो बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सक्रिय होईल, असा अंदाज आहे.