

पुणे : बिहारच्या शेतकरी कुटूंबातील लकी कुमार याने वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण करत उज्वल यश संपादन केले आहे. एनडीएच्या पदवीप्रदान सोहळ्यात लकी कुमार याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कारण या सोहळ्यात त्याची शेतकरी आई, ती अगदी साधा ड्रेस घालून आली होती. या वातावरणात त्या थोड्या गोंधळल्या. एका कोपऱ्यात उभ्या होत्या. मात्र, मुलाचे अस्खलित इंग्रजीतून बोलणे पाहून भारावल्या. पाणवलेल्या डोळ्यांनी 'मला मुलाचा अभिमान वाटतो...' असे त्यांनी मुलाबद्दल गौरवोद्गार काढले.
या सोहळ्यास प्रत्येक मुलाचे आई-वडील देशाच्या विविध भागांतून आले होते. बहुतांश मुलांचे बाबा सुटा-बुटांत, तर कुटुंबीय भरजरी कपडे घालून आले होते. बिहारमधील चालीसगाव येथून लकीकुमारची आई आणि लहान भाऊ आले होते. येथे सर्वच जण इंग्रजीतून संवाद साधत असल्याने ते दोघेही एका बाजूला कोपऱ्यात उभे होते. मात्र, जेव्हा लकीकुमार आपल्या आईला घेऊन माध्यमांसमोर आला तेव्हा त्याचे डोळे पाणावले. तो म्हणाला, 'माझे आई-वडील दोघेही शेतकरी. माझा चुलतभाऊ लष्करात आहे. त्याच्याकडून प्रेरणा मिळाली अन् एनडीएची तयारी केली. आज मला आई-वडिलांचा अभिमान आहे. कारण, त्यांच्या कष्टामुळे मी हवाईदलात अधिकारी होणार आहे.'
अगदी साध्या कपड्यात आलेल्या आईला पत्रकारांनी प्रश्न विचारले. मात्र, त्या अगदी मोजक्या शब्दांत बोलल्या. शेतात काय लावले आहे? याचे उत्तर मात्र त्यांनी दिले. त्या म्हणाल्या, 'आम्ही शेतात सध्या भाज्या लावल्या आहेत. मुलगा अधिकारी झाल्याचा अभिमान वाटतो,' अशी भावना त्यांनी व्यक्त केली.