

पुणे : पुढारी वृत्तसेवा
बच्चेकंपनीला सुटीत घरबसल्या जलरंगापासून ते पेन्सिल स्केचपर्यंतची चित्रे काढता येतील अन् त्यासोबत कलाकुसरीच्या वस्तू बनविणेही शिकता येईल. वेगवेगळ्या मोबाईल अॅप्लिकेशनवर त्याबद्दलची माहिती आणि व्हिडिओ उपलब्ध असून, ते पाहून आपण घरबसल्या विविध चित्रे अन् कलाकुसरीच्या वस्तू शिकू शकतो.
घरातील टाकाऊ वस्तूंपासून आपण विविध कलाकुसरीच्या वस्तू बनवू शकता…घरात असलेले कागद, आइस्क्रीम स्टिक्स अन् वेगवेगळ्या वस्तूंपासून विमान, फुलदाणी, पेन स्टॅण्ड यासारख्या वस्तू आपल्याला बनवता येतील. सध्या सुटीत आपण आवडते चित्र काढायलाही शिकू शकतो. त्यामध्ये निसर्गचित्रापासून ते प्राण्यांच्या चित्रांपर्यंतची दुनिया साकारू शकतो.
त्याचबरोबर कागद, पुठ्ठे आणि घरातील टाकाऊ वस्तू वापरून विविध कलाकृती साकारू शकतो. यामध्ये फ्लॉवरपॉट, कपाट, पेन स्टॅण्ड, शुभेच्छापत्रे, टोप्या अशा अनेक शोभिवंत वस्तू बनवता येतील. लहान मुलांमध्ये कलाकुसर व शोभिवंत वस्तू बनवण्याच्या कौशल्याची भर पडावी यासाठी पालकांनीही घरात बसून मुलांना बनवता येतील असे कलाकुसरीच्या वस्तूंचे व्हिडिओ दाखवावेत.
त्यातून मुले घरच्या घरी अशा वस्तू बनवायला शिकतील. पुठ्ठ्यांपासून टुमदार घर, पालखी, कप-बशी, विविध फळे, पेपर क्विलिंगपासून बनवलेली फुले, आइस्क्रीमच्या स्टिक्सपासून पेन स्टॅण्ड, फुलदाणी, डायनिंग टेबल, तसेच तुळशी वृंदावन, झाड व त्यावर पक्ष्याचे घरटे, तोरण, हँगिंग पीस या वस्तूही विद्यार्थ्यांना बनवता येतील.
साप-शिडी, लपवाछपवी, नेमबाजी…
चित्रे आणि कलाकुसरीच्या वस्तूंसह मुले घरच्या घरी काही मनोरंजक खेळही खेळू शकतात. त्यामध्ये साप-शिडी, नेमबाजी, लपवाछपवी, लिंबू-चमचा, स्मरणशक्तीसाठी प्रश्नमंजूषा स्पर्धा, असे वैविध्यपूर्ण खेळ त्यांना खेळता येतील. मग सुटीत चित्र, कलाकुसरीच्या वस्तू बनविणे आणि खेळांचा नक्कीच आनंद लुटा.
हे ही वाचा :