

खोर : दौंड तालुक्यातील खोर परिसर राज्यभर अंजीर उत्पादनासाठी प्रसिद्ध असताना यंदाच्या बदलत्या हवामानाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. नोव्हेंबरपासून अंजीरांच्या ‘खट्टा बहर’ हंगामाला सुरुवात झाली असली तरी सकाळची कडक थंडी, अधूनमधून ढगाळ वातावरण आणि अनियमित तापमानामुळे अंजीर फळांची गुणवत्ताच घसरू लागली आहे.
हवामानातील विसंगतीमुळे अंजीर उकलीचे प्रमाण वाढले असून फळांची गोडी, रसाळपणा व उत्पादन कमी होत आहे. याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. पुणे बाजारात दर्जेदार अंजीरांना प्रतिकिलो 60 ते 70 रुपये भाव मिळत असताना उकललेले अंजीर निम्म्या किमतीत विकले जात आहेत. त्यामुळे उत्पादकांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
अंजीर बागांचे रक्षण करण्यासाठी सरकार व कृषी विभागाने हवामान बदल परिणामांचा अभ्यास, अंजीरासाठी संरक्षणात्मक तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग व विपणन यासाठी अनुदान योजना लवकरात लवकर राबवण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
‘बदलत्या हवामानामुळे अंजीराची चव, आकार व चमक घटत आहे. उकललेले अंजीर बाजारात विकले तर तोटा होणारच. त्यामुळे आम्ही हेच अंजीर घरी वाळवून ‘सुक्या अंजीरा’मध्ये रूपांतरित करत आहोत. प्रक्रियेनंतर ग्राहकांना वेगळ्या प्रकारचा स्थानिक, आरोग्यदायी अंजीर देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे नुकसान भरून निघेल आणि आमच्या अंजीर उद्योगाला नवा बाजारमार्ग मिळू शकतो, असे अंजीर उत्पादक शेतकरी तानाजी डोंबे यांनी सांगितले.
खोर ग्रामस्थ, अंजीर उत्पादक आणि कृषीतज्ज्ञ एकत्र येऊन अंजीर संरक्षण व प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास दौंड तालुक्यातील अंजीरपट्टा अधिक सक्षम होईल. - समीर डोंबे, जालिंदर डोंबे, अंजीर उत्पादक
खोर (ता. दौंड) परिसरात वातावरणातील बदलत्या हवामानामुळे अंजीर उकललेले दाखविताना शेतकरी शांताराम डोंबे, तानाजी डोंबे. (छाया : रामदास डोंबे)