

बाणेर : पक्षी अभयारण्य असलेल्या पाषाण तलावालगत व नागरी वस्ती असलेल्या सुतारवाडीत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत आरएमसी प्लांट उभारण्याचा घाट घातला होता. याला स्थानिक नागरिकांनी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व पर्यावरणप्रेमी नागरिकांनी विरोध केल्यानंतर अखेर हा प्लांट बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे.
पाषाण तलाव परिसरात असलेले पक्षी अभयारण्य व नागरी वस्तीतील नागरिकांसाठी हा आरएमसी प्लांट धोकादायक असल्याचे लक्षात आल्याने मनसेचे मयूर सुतार यांनी महापालिका आयुक्त राष्ट्रीय महामार्ग विभाग यांना निवेदन देऊन हा प्लांट बंद करण्याचे आवाहन केले होते. या प्लांटचे काम बंद होत नाही. यामुळे रविवारी (दि. 23 नोव्हेंबर) आंदोलन करण्याचेही ठरवले होते. मनसेच्या वतीने उभारण्यात आलेल्या चळवळीचा रोष पाहता राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाआधीच आरएमसी प्लांट बंद करण्यास सुरुवात केली होती. परंतु, पुन्हा या ठिकाणी अशा अनधिकृतरित्या प्लांट उभारण्याच्या गोष्टी होऊ नयेत म्हणून, आरएमसी प्लांट ठिकाणी जमून आंदोलन करण्यात आले. आंदोलनाप्रसंगी उपस्थित महामार्ग विभागाचे अधिकारी मोहन दुबे आणि विक्रम पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आरएमसी प्लांट हटाओ चळवळीने व आंदोलनाने पर्यावरणाची हानी होण्यापासून आपल्या परिसराला वाचवल्याचे मयूर सुतार यांनी सांगितले.
या वेळी संबंधित प्लांट बंद करण्याचे आश्वासन उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले. तसेच, मशीनरी व यंत्रसामग्री हलवण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू केल्याचे सांगितले. या वेळी पांडुरंग सुतार, अनिकेत मुरकुटे, शिवम दळवी, नारायण सुतार, महेंद्र रणपिसे, नरेंद्र वाणी, नासिर शेख, विजय ढाकाने, उमेश साळुंखे, महेश सुतार, अमोल फाले, राहुल काकडे, शशिकांत खेडेकर, अनिता खेडेकर, शशिकला भोसेकर, शंकुतला सुतार, मनीषा सुतार, उर्मिला सुतार, अलका नाथ, ॲड. मनीषा करे आदी नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.
सुतारवाडीत उभारण्यात आलेल्या आरएमसी प्लांट ठिकाणी आंदोलन करून अधिकाऱ्यांना निवेदन देताना मयूर सुतार. सोबत परिसरातील नागरिक व ग्रामस्थ.