

पुणे: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या खुनाला 20 ऑगस्ट रोजी 12 वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, अजूनही या गुन्ह्याचा सूत्रधार मोकाट आहे. त्याला पकडण्यासाठी शासनाकडून पुरेसे प्रयत्न केले जात नसल्याचा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला.
या वेळी डॉ. हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, श्रीपाल ललवाणी, अनिल वेल्हाळ आदी उपस्थित होते. हमीद दाभोलकर म्हणाले, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचेही खून खटले सुरू आहेत. (Latest Pune News)
या चारही खुनांमागील सूत्रधारांवर कारवाई होऊ शकलेली नाही. जोपर्यंत हा सूत्रधार पकडला जात नाही, तोपर्यंत विवेकवादी कार्यकर्त्यांवरील धोका कायम राहणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्यामध्ये वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सुटका झाली आहे.
यासंदर्भात सीबीआयने अजूनही उच्च न्यायालयात दाद मागितलेली नाही. ही अक्षम्य दिरंगाई आहे. सीबीआयने लवकरात लवकर याचिका दाखल करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
स्मृती व्याख्यान आणि स्मृतिग्रंथमालेचे प्रकाशन
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीनिमित्त व्याख्यान आणि स्मृतिग्रंथाचे आयोजन सिंहगड रस्त्यावरील साने गुरुजी स्मारक येथे करण्यात येणार आहे. 17 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे ‘भारताचे संविधान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, तर 20 ऑगस्ट रोजी निवृत्त पोलिस अधिकारी मीरा चड्डा- बोरवणकर यांच्या हस्ते ग्रंथमालेचे प्रकाशन केले जाणार आहे.