

Low response to Sevadoot Scheme
पुणे: जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या ‘सेवादूत’ या महत्त्वाकांक्षी योजनेला पुणेकरांकडून अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत आता नागरिकांना घरबसल्या एका क्लिकवर सर्व सरकारी दाखले मिळत असले तरी, गेल्या सहा महिन्यांत केवळ 626 पुणेकरांनीच या सुविधेचा लाभ घेतला आहे.
प्रचार आणि प्रसिद्धीच्या अभावामुळे अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे. नोकरदार आणि व्यस्त नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने मार्च महिन्यात सेवादूत योजना सुरू करण्यात आली होती. यानुसार, महा- ई- सेवा, सेतू आणि सामायिक सुविधा केंद्रांमधील कर्मचारी ’सेवादूत’ म्हणून काम करतात. (Latest Pune News)
नागरिक अॅपवर दाखल्यासाठी अर्ज करू शकतात आणि हे सेवादूत तो दाखला त्यांच्या घरी पोहचवतात. शहरातील तब्बल 531 केंद्रांमधून ही सेवा दिली जात असूनही, ती लोकांपर्यंत पोहचलेली नाही. आतापर्यंत दिलेल्या दाखल्यांमध्ये उत्पन्नाचे दाखले 306 सर्वाधिक आहेत, तर अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल) 126 दुसर्या क्रमांकावर आहे.
प्रचाराचा अभाव, गोंधळाचे वातावरण, जिल्हा प्रशासनाला शहरी भागातून चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा होती, परंतु ही योजना लोकांपर्यंत पोहचवण्यात यश आलेले नाही. योजनेचा योग्य प्रचार-प्रसार झाला नसल्याने अनेक नागरिकांना याबाबत माहितीच नाही. धक्कादायक बाब म्हणजे, ही सेवा देणार्या काही केंद्रांमध्येही अजूनही या योजनेबद्दल संभ्रम आहे. त्यामुळे गरजू असूनही लोक या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाहीत, असे चित्र आहे.
योजनेच्या अंमलबजावणीची स्थिती (सहा महिन्यांत)
सहभागी केंद्रे - 532
लाभार्थी नागरिक - 626
अॅपमधील एकूण बुकिंग - 714
दिलेले एकूण दाखले - 535