

बापू रसाळे
ओतूर: उत्तर पुणे जिल्ह्यातील अणे-माळशेज पट्ट्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे आरक्षण जाहीर होताच राजकीय वातावरणात 'कही खुशी कही गम' असे चित्र निर्माण झाले आहे. या भागात महिलांसाठी सर्वाधिक जागा आरक्षित झाल्याने तसेच जुन्नर तालुक्यात सर्वत्र 'महिलाराज' असल्याने राजकीय चर्चाना चांगलेच उधाण आले आहे. (Latest Pune News)
आरक्षण जाहीर होताच गटागटांमध्ये उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाली असून, सोशल मीडियावर फोटोसह उमेदवारीचे संकेत देत मोबाईलवरच प्रचाराचा धुरळा उडविण्याचे चित्र दिसत आहे. काही नेतेमंडळींनी तर आपल्याच घरातील नव्या महिला चेहऱ्यांना राजकारणात पुढे करण्याची तयारी दाखवली आहे.
गटनिहाय पाहता डिंगोरे गट अनुसूचित जमाती (महिला) तर ओतूर-घालेवाडी गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) या आरक्षणात आले आहेत. त्यामुळे अनेक प्रस्थापित नेत्यांची राजकीय समीकरणे कोलमडली असून, त्यांची चांगलीच अडचण झाली आहे. ओतूर-धालेवाडी गटात सीमा अनिल तांबे, प्रज्ञा विनायक तांबे, डॉ. छाया अतुल तांबे, अक्षदा प्रसाद पानसरे, प्रांजल पंकज भाटे, लतिका मोहित ढमाले, राजश्री तुषार थोरात या महिला इच्छुकांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. तर पंचायत समितीकरिता प्रशांत डुंबरे, गणेश शिंदे, सचिन घोलप, दत्तात्रय डुंबरे, आशिष शहा, धनंजय डुंबरे, ऋषिकेश डुंबरे, किसन गाढवे, संतोष डुंबरे, मयूर मालकर आणि सिद्धार्थ तांबे यांची नावे आघाडीवर आहेत. याशिवाय आणखी काही नव्या चेहऱ्यांची भर पडण्याची शक्यता मतदारांमध्ये व्यक्त होत आहे.
आरक्षण घोषित होताच दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आपली तयारी जाहीर करत प्रचार मोहीम सुरू केली आहे. 'मीच उमेदवार' अशा भावनेने अनेकांनी जनसंपर्काचा मोर्चा काढला असून, गावागावात वातावरण तापले आहे.
इच्छुक उमेदवारांनी प्रत्येक साखरपुडा, लग्नसमारंभ, दशक्रिया किंवा वाढदिवस कार्यक्रमांना हजेरी लावून मतदारांशी स्नेहजोड निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अपेक्षित आरक्षण न मिळाल्याने काही प्रस्थापित नेते आता आपल्या कुटुंबातील किंवा नातेवाईक असलेल्या महिला सदस्यांना पुढे करून राजकीय अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करत आहेत. एकूणच ओतूर-घालेवाडी गटातील आगामी निवडणूक नव्या चेहन्यांमुळे अत्यंत चुरशीची, अटीतटीची आणि रंगतदार होणार यात शंका नाही.