

पुणे: खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करताना मेहकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर याला गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या.
दरम्यानच्या कालावधीत त्याने विमानाने प्रवास करून केरळ पर्यटन केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. दक्षिण भारतातील पद्मनाभस्वामी मंदिरासह इतर मंदिरांना देखील त्याने भेटी दिल्या. या वेळी त्याच्यासोबत तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, त्या दोघांच्या बायका आणि वृंदावनी वाडेकर होती. (Latest Pune News)
आयुष ऊर्फ गोविंद कोमकर याच्या खून प्रकरणात बंडू आंदेकर, तुषार, स्वराज आणि वृंदावनी यांना आरोपी करण्यात आले आहे. या चौघांना गुन्हे शाखेच्या पथकाने बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून समृद्धी महामार्गावर एका खासगी बसमधून प्रवास करताना सोमवारी (दि. 8) रात्री पकडले.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत बोलताना सांगितले की, बंडू आंदेकर याने एका नामांकित ट्रॅव्हल्स कंपनीच्या माध्यमातून केरळ पर्यटनाची टूर बूक केली. 29 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरच्या कालावधीत ही टूर बूक करण्यात आली होती.
केरळ येथील मुक्काम संपल्यानंतर बंड्या आणि इतर सर्वजण विमानाने सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सात ते साडेसात वाजताच्या सुमारास मुंबई विमानतळावर उतरले. त्यानंतर त्यांनी खासगी बसने थेट नाशिक गाठले. तेथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सात सप्टेंबर रोजी दुपारी सर्वजण वणी येथे पोहचले. रात्रीचा मुक्काम तेथेच केला. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी देवीचे दर्शन केल्यानंतर मेहकरचा रस्ता धरला.
पोलिसांनी पाठलाग करून पकडले
एव्हाना आयुष कोमकर याचा खून झाल्याचे बंड्याला समजले होते. गुन्हा दाखल झाल्याने त्याला पोलिस आपल्या मागावर असल्याची चाहूल लागली होती. पोलिसांना गुंगारा देण्याची खबरदारी तो घेत होता. परंतु, पोलिसांच्या खबऱ्याने त्याचे काम चोख बजावले होते. बंड्याच्या पर्यटन दौऱ्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.
बंड्या मुंबईतून नाशिक, वणी येथे खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करीत असल्याचे गुन्हे शाखेच्या पथकाला समजले. पथकाने सुरुवातीला त्याला बस बूक करून देणाऱ्याला ताब्यात घेतले. त्याने दुसऱ्या बसची माहिती दिली. त्याच्याकडून बंड्या प्रवास करीत असलेली बस त्यांनी शोधून काढली. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक किरण नाईक, पोलिस उपनिरीक्षक गौरव देव, पोलिस हवालदार सुरेंद्र जगदाळे, कर्मचारी अनिल कुसाळकर, पवन भोसले, गीतांजली जांभुळकर यांचे पथक नाशिक येथे पोहचले होते.
ट्रॅव्हल्सचे लोकेशन ठरला आधार
पोलिसांनी ट्रॅव्हल्सचे लोकेशन पाहिले, तेव्हा त्यांच्यापासून ती बस दीडशे किलोमीटर दूर होती. त्या वेळी दुपारचे दीड वाजले होते. पोलिसांनी दोन मोटारीने बसचा पाठलाग सुरू केला. अखेर बंड्या आणि इतर आरोपी प्रवास करीत असलेली बस गुन्हे शाखेच्या पथकाला मेहकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर नजरेस पडली.
क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी आपल्या दोन मोटारी बसला आडव्या लावून तिला थांबविले. पोलिस ट्रॅव्हल्स बसमध्ये चढताच बंड्याने पोलिसांना ओळखले. पोलिसांनी बंड्या आणि इतर तिघा आरोपींना ताब्यात घेऊन अंगझडती घेतल्यानंतर त्यांना पुण्यात घेऊन आले. अपर पोलिस आयुक्त गुन्हे शाखा पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे, कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.