..अन् पालिकेचे पथक कारवाईविना परतले; लुल्लानगर येथे सीमाभिंतीवरून वाद

..अन् पालिकेचे पथक कारवाईविना परतले; लुल्लानगर येथे सीमाभिंतीवरून वाद

कोंढवा : पुढारी वृत्तसेवा : महापालिका म्हणते की हा '205'चा रस्ता असेल, तर महापालिका प्रशासनाने कायदेशीर कागदपत्रे सादर करावीत. बळाचा वापर करून बेकायदेशीर कारवाई करू नये, कारवाई केली तर आम्ही जिवाची पर्वा न करता प्रतिकार करून, असा पवित्रा लुल्लानगर येथील यश रेसीडेन्सी को-ऑप. सोसायटीतील नागरिकांनी घेतला. त्यामुळे सीमाभिंत पाडण्याची कारवाई करण्यासाठी
आलेले महापालिकेचे पथक कारवाईविनाच परतले!

परिसरातील साहनी सूजान पार्कमधील यश रेसीडेन्सी सोसायटीला लागून असलेली सीमाभिंत पाडण्यासाठी अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी गुरुवारी आले होते. या कारवाईस सोसायटीतील रहिवाशांनी विरोध केला. सोसायटीचा प्लान 2009 साली महापालिकेने मंजूर केला आहे. झोनिंग नकाशामध्ये '205'च्या रस्त्याचा उल्लेख नाही. रहिवाशांना महापालिकेच्या अधिकार्‍यांनी नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करु नये. हा रस्ता आमच्या जागेतून जात नाही. यामुळे जबरदस्तीने अधिकार्‍यांना कारवाई करता येणार नाही.

अधिकारी बिल्डरच्या फायद्यासाठी सीमाभिंत पाडून रस्ता तयार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप या वेळी नागरिकांनी केला. नागरिकांनी तीव्र विरोध केल्याने अधिकारी कारवाई न करताच रिकाम्या हाताने परत गेले. यावेळी कारवाईसाठी आलेल्या अतिक्रमण विभागातील आधिकार्‍यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी आमचे वरिष्ठ आधिकारी महापालिकेत वरिष्ठांशी या कारवाईसंदर्भात चर्चा करण्यासाठी गेले असल्याचे सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news