अमोल कोल्हे मतदारसंघात फिरकले नाही, आढळरावांनी मात्र जनतेला जपले : अतुल बेनके

अमोल कोल्हे मतदारसंघात फिरकले नाही, आढळरावांनी मात्र जनतेला जपले : अतुल बेनके

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे गेल्या पाच वर्षांत कोरोना काळ वगळता मतदारसंघामध्ये फिरकलेच नाहीत, याउलट शिवाजीराव आढळराव कोरोना काळ आणि त्यानंतर देखील पायाला भिंगरी बांधल्यागत संपूर्ण मतदारसंघामध्ये जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी फिरत राहिले आणि म्हणूनच आज शिवाजीराव आढळराव यांना शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय, असे प्रतिपादन जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांचा मतदारांशी संपर्क दौरा जुन्नर तालुक्यातील हिवरे, खोडद, कांदळी वडगाव, साळवाडी बोरी, शिरोली, सुलतानपूर, निमगाव सावा, कावळ पिंपरी, मंगरूळ, रानमळा आदी भागात पार पडला. या वेळी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, आमदार शरद सोनवणे, भाजपाचे नेते भगवान घोलप, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सूर्यकांत ढोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार बेनके पुढे म्हणाले की, अमोल कोल्हे यांनी मागील पाच वर्षांमध्ये मतदारांशी संपर्क ठेवला नाही. अनेकदा त्यांची बाजू आम्ही मारून न्यायचो. गावोगावी विकासकामांच्या माध्यमातून आम्ही गेल्यावर लोक आम्हाला विचारायचे, ज्यांना आम्ही निवडून दिले ते खासदार अमोल कोल्हे कुठे आहेत? त्या वेळी आमच्याकडे काही उत्तर नव्हते. अमोल कोल्हे निवडून आल्यानंतर त्यांनी जनतेशी संपर्क ठेवला नाही. याउलट शिवाजीराव आढळराव यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील गोरगरीब जनतेशी नियमित संपर्क ठेवला. कोरोनाच्या काळातदेखील गरजवंतांना मदत केली.

अमोल कोल्हे यांना मागच्या लोकसभा निवडणुकीत निवडून देऊन चूक झाली, अशाप्रकारे लोक आमच्याशी बोलतात. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सहा महिने मतदारसंघात आले. कांद्याच्या माळा गळ्यात घालून आक्रोश मोर्चा काढण्याचं नाटक केलं, प्रत्यक्षात मात्र शेतकर्‍यांच्या पदरात काही देऊ शकले नाहीत. एक निष्क्रिय खासदार म्हणून अमोल कोल्हे यांची मतदारसंघामध्ये ओळख निर्माण झाली आहे. शिवाजीराव आढळराव यांच्या माध्यमातून खासदार असताना आणि खासदार नसतानादेखील मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लागली आहेत आणि म्हणूनच सध्या शिवाजीराव आढळराव यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद सोनवणे म्हणाले की, शिवाजीराव आढळराव कामाचा माणूस आहे. गोरगरीब सामान्य माणसाला त्यांचा मोठा आधार असतो. दर रविवारी त्यांच्या लांडेवाडी या ठिकाणी जनतादरबार भरत असतो. तिथे आलेल्या प्रत्येक माणसाचं काम मार्गी लावण्यासाठी आढळराव प्रयत्न करत असतात. जुन्नर तालुक्यामधून आढळराव यांना आम्ही निश्चित मताधिक्य मिळवून देऊ. आमदार अतुल बेनके, भाजप नेते आशाताई बुचके व आम्ही सगळे हातात हात घालून शिवाजीराव आढळराव यांना पुन्हा खासदार करणारच, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव म्हणाले की, अमोल कोल्हे फक्त बोलण्यात पटाईत आहेत. गेल्या पाच वर्षांत कोणतेही ठोस काम मार्गी लावले नाही. केवळ भाषणबाजी करून जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिलं त्या मतदारांशी त्यांनी प्रतारणा केली आहे. मी मतदारसंघात फिरत असताना लोक मला सांगताहेत, दादा आमची कोल्हे यांना निवडून देऊन चूक झाली. आता ती चूक होणार नाही. दादा आम्ही तुमच्या सोबतच. 2019 ला माझा पराभव झाल्यानंतर मी दररोज जनतेच्या सोबत राहिलो. शिरूर लोकसभा मतदारसंघातील कानाकोपर्‍यातील जनतेचे प्रश्न सोडवत राहिलो. सामान्य जनता हीच माझी ताकद आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकरी हिताचे निर्णय अनेक झालेले आहेत.

शेतकर्‍यांचे इतर प्रश्नदेखील मी मार्गी लावून घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचा आदर्श सगळ्यांनाच आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांची ताकद माझ्यासोबत आहे. विकासकामाला आम्ही कुठेही कमी पडणार नाही. जनता हे माझं दैवत आहे आणि या दैवताला मी कधीच विसरणार नाही.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे म्हणाले की, शिवाजीराव आढळराव कामाचा माणूस आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे फक्त बोलबच्चन करण्यात पटाइत आहेत.

त्यांना मतदारसंघातील जनतेशी काही देणं-घेणं नाही. स्वतःच्या व्यवसायात गर्क राहून शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेला त्यांनी वार्‍यावर सोडले. या मतदारसंघातील जनतेला कोल्ह्यांचे नेतृत्व कदापि मान्य नाही. अमोल कोल्हे यांच्या वक्तृत्वाला मतदार मागच्या वेळेला भुलले. ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिले, त्या मतदारांचे आभार मानायला देखील मागील पाच वर्षांत त्यांना वेळ मिळाला नाही आणि म्हणूनच आता या वेळी मतदारांनी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सगळे एक जिवाने लढू आणि शिवाजीराव आढळराव यांना लोकसभेत खासदार म्हणून पाठवू, असा आत्मविश्वास काळे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news