पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉरसाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज ब्लॉक | पुढारी

पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉरसाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज ब्लॉक

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : पनवेल-कर्जत दुहेरी उपनगरीय रेल्वे मार्गावरील चिखले पुलाच्या कामाकरिता उद्या बुधवारी 10 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे पुणे वाहिनीवर सर्व प्रकारच्या वाहनांना (हलकी व जड-अवजड वाहने) बंदी घातली आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) हे काम सुरू आहे.

एमआरव्हीसीतर्फे पनवेल ते कर्जत दरम्यान दोन रेल्वे मार्ग टाकण्यात येत आहेत. या मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गात चिखले पूल उभारण्यात येत आहे. त्याचे गर्डर टाकण्यात येत आहे. त्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर 07.560 कि. मी. मुंबई ते पुणे वाहिनीवर (पुण्याकडे जाणार्‍या वाहिनीवर) सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या दरम्यान वाहन चालकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्ग दिले आहेत.

पर्यायी मार्ग
1. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून मुंबई ते पुणे वाहिनीवर (मुंबईहून पुणेकडे) जाणारी हलकी वाहने ही कळंबोली सर्कलवरून वळवून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 या मार्गावरून मार्गस्थ करता येतील.

2. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून मुंबई ते पुणे वाहिनीवर (मुंबईहून पुणेकडे) सर्व प्रकारची वाहने ही कळंबोली सर्कलवरून वळवून कळंबोली डी पॉईट-करंजाडे-पळस्पे व पुढे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 या मार्गावरून मार्गस्थ करता येतील.

3. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून मुंबई ते पुणे वाहिनीवर (मुंबईहून पुणेकडे) जाणारी सर्व प्रकारची वाहने ही 09.500 कि.मी. येथून द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील.

4. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून मुंबई ते पुणे वाहिनीवर (मुंबईहून पुणेकडे) जाणारी हलकी वाहने राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 जुना मुंबई-पुणे महामार्गावरून पुढे जाऊन शिंग्रोबा घाटातून मॅजिक पॉईंट 42.000 कि. मी. येथून पुन्हा द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील.

Back to top button