

पुणे: पुण्याच्या ॲमनोरा आणि फुरसुंगी परिसरात सुरू असलेल्या एका कथित हायटेक सायबर फसवणूक रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, बनावट कागदपत्रे, बँक खात्यांची माहिती आणि एका पिस्तूलसह जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
हडपसर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, ॲमनोरा चेंबर्स, ॲमनोरा मॉल आणि फुरसुंगी येथील कार्यालयांमधून ॲपेक्स ॲचिव्हर आणि जे. के. इंडिया सोल्यूशन प्रा. लि. या नावाने कॉल सेंटर चालविले जात होते. या ठिकाणांहून नागरिकांना विविध वेबसाइटद्वारे ऑनलाइन गेमिंगमध्ये गुंतवून पैसे जमा करण्यास भाग पाडले जात होते. विश्वास संपादन करून आर्थिक व्यवहार घडवून आणल्यानंतर फसवणूक केल्याचा आरोप आहे.
पोलिसांंनी सांगितले की, १० जून रोजी दुपारपासून सुरू झालेल्या या कारवाईत पुणे शहर पोलिसांच्या विविध शाखांतील २०० अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. सायबरतज्ज्ञ, फॉरेन्सिक टीम आणि तांत्रिक पथकांच्या मदतीने एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी हार्ड डिस्क, एसएसडी, सर्व्हर आणि ऑटो डायलर मशिन, शेकडो सिम कार्ड, सिम बॉक्स सेटअप, लॅपटॉप, मोबाईल, डीव्हीआर, सीसीटीव्ही डेटा ग्राहकांना फसवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कॉल स्क्रिप्ट अनेक बँक खात्यांची कागदपत्रे, रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने, पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी संतोष वेंजणेकर याच्यावर कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन त्यात फेरफार करून सिम कार्ड मिळवणे आणि बनावट बँक खाती उघडण्याचा गंभीर आरोप आहे. या खात्यांचा वापर आर्थिक व्यवहार आणि रक्कम वळवण्यासाठी करण्यात येत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक युवराज पोमण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हडपसर पोलिस ठाण्यात संतोष दत्ता वेंजणेकर, अमित मजेटिया, भागीरथ पांड्या, विनायक ऊर्फ दीपक मनोहर इक्के, निदा आरिफ अन्सारीसह १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन मुलांचे शोषण?
या प्रकरणातील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे कॉल सेंटरमध्ये पाच अल्पवयीन मुला-मुलींना कामावर ठेवण्यात आले होते, असा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला. या अल्पवयीन मुलांकडून बेकायदेशीर स्वरूपाचे काम करून घेतल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.