

मंचर: आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागात मुसळधार पावसामुळे घोड नदीला पूर आल्याने आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील 25 बंधारे रविवारी (दि.28) सकाळी पाण्याखाली गेले.
हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. धरणाच्या सांडव्यावरून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात येत आहे. याशिवाय गोहे खोऱ्यातील पावसाचे पाणीही थेट घोड नदीत मिसळत असल्याने नदीपात्रात पाण्याचा प्रचंड ओघ निर्माण झाला आहे. त्यामुळे घोड नदीवरील सुमारे 25 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. (Latest Pune News)
नदीपात्रातील पाणी झपाट्याने वाढत असल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी धोकादायक ठिकाणी जाणे, नदीपात्र ओलांडणे किंवा बंधाऱ्याजवळ थांबणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे ग्रामीण भागातील काही शेतजमिनींमध्येही पाणी साचले आहे.
हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण व गोहे खोऱ्यातील पावसामुळे घोड नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाढले आहे. सुरक्षिततेसाठी टप्प्याटप्प्याने पाणी सोडले जात आहे. नदीकाठच्या गावांनी दक्ष राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
- दत्ता कोकणे उपविभागीय अधिकारी. कुकडी प्रकल्प.