

मंचर: आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे घोड नदीला रविवारी (दि. 28) पूर आला. त्यामुळे नदीपात्र ओसंडून वाहत आहे. परिणामी, नदीकाठच्या गावांमधील शेती पाण्याखाली गेली असून, पिकांचे नुकसान झाले आहे.
तरकारी, मका, ऊस आदी हंगामी पिके पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनींमध्ये गाळ साचल्याने पुढील हंगामतील पीक निघणे कठीण झाले आहे. पिकांमध्ये पाणी घुसल्याने पीक वाया जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. (Latest Pune News)
पूरामुळे शेतीचे बांध तुटले, जनावरांसाठी असलेले चारा कुरण वाहून गेले. काही ठिकाणी घरगुती विहिरींमध्येही नदीचे पाणी शिरले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.
आमच्या शेतातील फ्लॉवर पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. कष्ट करून लावलेले पीक एका रात्रीत पावसामुळे बुडाले. फ्लॉवर पीक सडून जाऊन नुकसान झाले आहे.
- अरुण बांगर, शेतकरी, पिंपळगाव