

Death of patient due to lack of road connectivity in Pune
मंचर: आंबेगाव आणि जुन्नर तालुक्याच्या सीमेवरील दुर्गम खेतेपठार (ता. आंबेगाव) येथील दोनवर्षीय मुलाला रस्त्याअभावी जीव गमावावा लागला. रस्ता नसल्याने उपचारांसाठी तब्बल चार तासांचा विलंब झाला. यातून आदिवासी शेतकरी कुटुंबीयातील या बालकाचा हृदयद्रावक मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातून आक्रोश व्यक्त केला जात आहे.
खेतेपठार येथील आदित्य विकास घनकुटे या चिमुकल्याने रविवारी (दि. 15) दोन वर्षे पूर्ण करून तिसऱ्या वर्षात पदार्पण केले होते. वाढदिवसाचा आनंद घरात दरवळत असतानाच नियतीने घाला घातला. सोमवारी (दि. 16) दुपारी आदित्यला त्याची आई सुनिता या वरणभात खाऊ घालत होत्या. त्यावेळी त्याला ठसका लागला आणि त्याची दातखिळी बसली. त्यामुळे आदित्यची आई, आजी शारदा घनकुटे आणि त्यांचे कुटुंबिय घाबरले. त्यांनी आदित्यला पाठीवर घेऊन पायी चालत उपचारासाठी घोडेगाव येथे निघण्याचा प्रयत्न केला, मात्र रस्ता नसल्याने त्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला.
ऐन उन्हाच्या भरात घामाच्या धारा निथळत तीन ते चार किलोमीटर डोंगर दऱ्याची आणि उताराच्या पायवाटेवरून रामवाडी येथे आले. तेथून दुचाकीवर त्यांचे नातेवाईक दत्तात्रय खमसे यांना घेऊन घोडेगाव ग््राामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी बाळाला आणले. त्यावेळी बाळाची आरोग्य परिस्थिती चिंताजनक बनली होती. त्यांना रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रुग्णालयात पोहचण्यासाठी जवळपास चार तासाचा विलंब झाला होता. वेळेत दवाखान्यात पोहोचता न आल्याने त्या निरागस जीवाचा मृत्यू झाला.
घोडेगाव ग््राामीण रुग्णालयातून बाळाला शवविच्छेदनासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉ. साहिल टाके यांनी शवविच्छेदन केले. त्यावेळी प्राथमिक अंदाजानुसार बाळाच्या अन्ननलिकेतील अन्नाचे कण श्वासनलिकेत अडकून श्वास रोखला गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष निघाला आहे. मुलगा आदित्य याचे मृत्यू झाल्याने आई सुनिता यांना मानसिक धक्का बसला आहे. त्यांना घोडेगाव येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
ही बाळाच्या मृत्यूची घटना केवळ एक दुर्दैवी प्रसंग नसून, रस्ता प्रशासनाच्या दुर्लक्षाचा जिवंत पुरावा ठरला आहे. आपटीमार्गे सुरू असलेले कामही वन विभागाच्या अडथळ्यामुळे अपूर्णच राहिले आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत मदत मिळणे अशक्य बनले आहे. आता विकासाच्या दाव्यांमध्ये खेतेपठार नेमके कुठे आहे? असा आदित्यच्या मृत्यूने एकच प्रश्न सर्वांसमोर उभा केला आहे.
कोणत्याही मार्गाने का होईना, पण सुरक्षित आणि कायमस्वरूपी रस्ता तत्काळ तयार करण्यात यावा. आज आदित्य नाही, पण त्याच्या जाण्याने उठलेला आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कारण आणखी एकही जीव अशा दुर्लक्षाचा बळी जाऊ नये, हीच खरी श्रद्धांजली ठरेल.
शांताराम घनकुटे, ग््राामस्थ खेतेपठार
आम्ही वर्षानुवर्षे रस्त्याची वाट पाहतोय, पण अजूनही काहीच बदल झाला नाही. आज आदित्य गेला, उद्या कोणाचा नंबर लागेल सांगता येत नाही. आम्हाला फक्त सुरक्षित रस्ता हवा आहे.
तुकाराम भांगरे, ग््राामस्थ खेतेपठार
कोणत्या मार्गाने रस्ता होतो याचा वाद नको, पण रस्ता झाला पाहिजे. आमच्यासाठी तोच जीवदान ठरेल. आजारी माणूस वेळेत पोहोचला नाही, तर जीव वाचवणे अशक्य होते, हे वास्तव आहे.
लहू गिजरे, ग््राामस्थ खेतेपठार
खेतेपठार परिसर तीन ग््राामपंचायतींमध्ये विभागलेला असला, तरी प्रत्यक्षात येथे जाण्यासाठी आजही ठोस रस्ता नाही. काही ठिकाणी फक्त पाऊलवाटा, तर काही ठिकाणी धोकादायक कच्चे मार्ग आहेत. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच बिकट होते. जुन्नर तालुक्यातील वैष्णवधामकडील कच्चा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. येथे चारचाकी वाहन जाणे अशक्य झाले आहे. रस्त्याचा प्रश्न अजून ही मार्गी लागलेला नाही.
अविनाश गवारी, सचिव, जनवादी युवा संघटना आंबेगाव तालुका
खेतेपठार येथे रस्त्याचा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असून, रस्ता होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.
प्रमिला वाळुंज, गटविकास अधिकारी, आंबेगाव