पुणे : पुढारी वृत्तसेवा : शनिवारवाडा परिसरातील शंभर मीटर परिघातील जुन्या वाड्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी व वाड्यांचा पुनर्विकास करण्यासाठी महापालिकेने विशेष परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आपले पुणे संस्थेने केली आहे.
पुरातत्व विभागाने शनिवारवाडा परिसरातील बांधकामांवर बंधन घातले आहे. यामुळे या भागातील जुन्या वाड्यांची दुरुस्ती होत नाही, त्यांचा पुनर्विकास केला जाऊ शकत नाहीत.
पुरातत्व विभागाच्या नियमाप्रमाणे नवीन बांधकाम वा दुरुस्ती करणे शक्य नाही. यापूर्वी कसबा पेठेतील जुने वाडे पडणे किंवा काही भाग कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. नुकतेच मोटे मंगल कार्यालयाजवळील महाजन वाडा ही तीन मजली इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या इमारतीत लोक राहत नसल्याने जीवित हानी झाली नाही. नवीन बांधकाम आणि दुरुस्तीला परवानगी मिळत नसल्याने या भागातील वाड्यांतील रहिवाशांना मुठीत जीव धरून जगावे लागत आहे.
ज्या ठिकाणी आता दुरुस्ती करणे, पुनर्विकास करणे गरजे आवश्यक आहे. अशा वाड्यांबाबत महापालिकेने पुढाकार घेतला पाहिजे, अशी मागणी आपले पुणे या संस्थेने केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एका निकालात हेरिटेज असताना महापालिकेस बांधकामास विशेष परवानगी द्यावी, असे आदेश दिले आहे. या निर्णयाचा आधार घेत पुण्यात काही करता येईल का? पुरातत्व विभागाच्या कायद्यामध्ये काही सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करता येईल का? विशेष बाब म्हणून या परिसराचा एक एकत्रित प्लान तयार करून तो पुरातत्व विभागाला सादर करून त्यास मंजुरी मिळविता येईल का? याचा विचार महापालिकेने करावा, अशी मागणी संस्थेचे सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे, उज्ज्वल केसकर यांनी केली.
हेही वाचा