सांगली; पुढारी वृत्तसेवा : खटल्यात तडजोड घडवून लवकर निकाल मिळवून देण्यासाठी 20 हजाराची लाच स्वीकारल्या प्रकरणी सरकारी वकील सोमनाथ काकासोा माळी (वय 36, रा. सुभाषनगर, ता. मिरज) यांना 'लाचलुचपत' विभागाने रकमेसह सोमवारी रंगेहात पकडले.
याबाबत तक्रारदारांनी येथील 'लाचलुचपत' विभागाकडे आठ डिसेंबर रोजी तक्रार केली होती. 'लाचलुचपत' विभागाने विजयनगर येथील न्यायालय परिसरामध्ये सापळा रचला होता. दुपारी चारच्या दरम्यान लाचेच्या रकमेपैकी 20 हजार रुपये तक्रारदार यांनी माळी यांना दिले. ही रक्कम माळी यांनी न्यायालयाबाहेर असलेल्या रस्त्यावर पंचासमक्ष स्वीकारली. त्यानंतर मोटरसायकलवरून निघून जाताना त्यांना नेमीनाथनगर येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरा सुरू होती. पोलिस उपायुक्त अमोल तांबे, अप्पर पोलीस उपायुक्त पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संदीप पाटील, उपअधीक्षक विनायक भिलारे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय पुजारी आदींनी कारवाईमध्ये भाग घेतला.