नवी मुंबई : उत्सवकाळात आवाक्याबाहेर गेलेले खोबऱ्याचे दर आता काहीसे कमी झाले आहेत. दिवाळीनंतर मागणी घटल्याने एपीएमसी घाऊक बाजारात प्रतिकिलो सुमारे 30 रुपयांनी दर कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
आगामी काळात मागणीनुसार दरांत पुन्हा चढ-उतार होण्याची शक्यता व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवापाठोपाठ दिवाळीच्या फराळासाठी खोबऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. यंदा अतिवृष्टीमुळे नारळाची आवक कमी झाली असल्याने स्थानिक बाजारपेठेत दर वाढले होते.
गेल्या चार ते पाच महिन्यांपासून खोबऱ्याचे भाव अक्षरशः गगनाला भिडले होते. ऐन दिवाळीत खोबऱ्याचे दर आणखी वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांसह मध्यमवर्गीयांच्या खिशावरही भार पडला होता. मात्र, आता दिवाळीचा उत्सवकाळ संपल्यानंतर लगेचच खोबऱ्याची मागणी कमी झाली होती. त्याचा थेट परिणाम बाजारातील खोबऱ्याच्या दरांवर झाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. घाऊक विक्रेत्यांकडे खोबरे 400 रुपयांवरून सुमारे 370 रुपयांवर आले आहे. तर किरकोळ बाजारात भाव 480 रुपयांवरून 440 ते 450 रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
सध्या तमिळनाडू येथून खोबऱ्याची आवक होत आहे. पावसामुळे खोबरे लवकर खराब होण्याची शक्यता असल्याचेही व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यात डिंक लाडूसाठी खोबऱ्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता असल्याने दर पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
नारळाचे दर उतरणीला
यंदा बाजारात खोबऱ्याबरोबरच नारळाचे भावही आता काहीसे उतरले आहेत. उत्सवकाळात किरकोळ बाजारात नारळाचे दर प्रतिनारळ 40 ते 45 रुपये इतके झाल्याचे चित्र होते. मात्र, घाऊक बाजारात नारळाच्या दरातही आता घट नोंदवली गेली असून, यापूर्वी प्रतिशेकडा 3 हजार 200 रुपयांपर्यंत पोहोचलेले नारळाचे दर आता 2 हजार 900 रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. येत्या काळात खोबऱ्याचे दर आणखी किती वाढतात की जैसे थे राहतात हे येत्या काळात स्पष्ट होईल.
दिवाळीनंतर मागणी नैसर्गिकरित्या घटते. त्यामुळे खोबऱ्याचे दर काही प्रमाणात खाली आले आहेत. मात्र, हवामानातील अनिश्चितता आणि डिसेंबरमध्ये मागणी वाढल्याने पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दीपक छेडा, घाऊक व्यापारी