मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गेल्या दशकभरात सागरी अर्थव्यवस्थेत केलेल्या सुधारणांमुळे भारत आता एक उदयोन्मुख सागरी शक्ती बनला आहे. मोठ्या प्रकल्पांसह भारताने जागतिक सागरी नकाशावर आपले स्थान ठळक केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सोमवारी केले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी सज्ज आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारच्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने आयोजित केलेल्या इंडिया मेरिटाईम वीक म्हणजे भारत सागरी सप्ताह 2025 चे उद्घाटन केल्यानंतर शहा बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन शरण मांझी, केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि केंद्रीय सचिव विजय कुमार, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अमित शहा म्हणाले की, भारताची सागरी स्थिती, लोकशाही, स्थैर्य आणि नौदल क्षमता, हिंद-प्रशांत क्षेत्र आणि ग्लोबल साऊथ यांच्यातील एक पूल म्हणून काम करत आहे. यामुळे विकास, सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षणाला प्रभावीपणे गती मिळत आहे, याकडे शहा यांनी लक्ष वेधले. भारताला 11 हजार किलोमीटरपेक्षा अधिक सागरी किनारा लाभला आहे.
13 किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि सागरी व्यापार देशाच्या जीडीपीमध्ये सुमारे 60 टक्के योगदान देतात. त्याचप्रमाणे सुमारे 23 लाख किलोमीटरचे आर्थिक क्षेत्र असून, हे जगभरातील गुंतवणूकदार आणि उत्पादकांना आकर्षित करत आहेत, असेही शहा यांनी सांगितले.
आज हिंद महासागरातील 28 देश जागतिक निर्यातीत अंदाजे 12 टक्के योगदान देतात, या सागरी सप्ताहाद्वारे जागतिक गुंतवणूकदार आणि जागतिक सागरी उद्योजकांसाठी यातून संधींची दारे खुली झाली आहेत, असेही शहा यांनी सांगितले. तर, सागरी उद्योग हा भारताच्या आर्थिक विस्ताराचा कणा आहे आणि सागरी सप्ताहासारखे उपक्रम एका बलशाली आणि आत्मनिर्भर राष्ट्रासाठी केंद्र सरकारचा दृष्टिकोन प्रतिबिंबित करतात, असे सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले.
महाराष्ट्र देशाच्या सागरी शक्तीचा केंद्रबिंदू ः मुख्यमंत्री
देशाच्या सागरी सामर्थ्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केले. पालघरमध्ये निर्माण होणारे वाढवण बंदर, जागतिक व्यापार आणि जागतिक पुरवठा साखळीमध्ये भारताचा सहभाग व्यापक करेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राने जहाज बांधणी धोरण सुरू केले असून, याअंतर्गत सर्व परिचालक आणि जहाज बांधणी क्षेत्रातील गुंतवणूकदारांसाठी अत्यंत भक्कम अशी धोरणात्मक चौकट तयार केली आहे.
पंतप्रधानांचे सागरी सप्ताहात संबोधन
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सागरी सप्ताहात येत्या 29 तारखेला सहभागी होतील. सागरी क्षेत्रातील जगभरातील आघाडीच्या निवडक कंपन्यांच्या आंतरराष्ट्रीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत एका जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाचे अध्यक्षस्थानही भूषवणार आहेत. यावेळी 11 देशांचे परराष्ट्र मंत्री उपस्थित राहणार आहेत. परिषदेत 100 पेक्षा अधिक देशांतील साडेतीनशेहून अधिक तज्ज्ञ सहभागी झाले असून, सागरी क्षेत्रात 10 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.