अजित पवारांचा पुतण्या युगेंद्रला झटका; बारामती कुस्तीगीर संघावरून हटविण्याच्या हालचाली

अजित पवारांचा पुतण्या युगेंद्रला झटका; बारामती कुस्तीगीर संघावरून हटविण्याच्या हालचाली
[author title="राजेंद्र गलांडे" image="http://"][/author]
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या युगेंद्र पवार यांच्याकडून बारामतीत कुस्तीगीर संघाचे अध्यक्षपद काढून घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या पराभवानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून युगेंद्र यांना हटवण्यात येणार असल्याची चर्चा बारामतीत आहे. युगेंद्र यांनी मात्र याबाबत माझ्याकडे अधिकृतपणे काहीही आलेले नाही, असे सांगितले.

बहिणीच्या विजयाने काका पुतण्यावर नाराज?

बारामती शहर व तालुक्यात युगेंद्र यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची मोठी जबाबदारी सांभाळली. शिवाय बारामतीचा विकास हा शरद पवार यांच्यामुळे झाल्याचे त्यांनी सांगितले होते. येथील महत्त्वाच्या संस्था शरद पवार यांनीच उभ्या केल्या असल्याचेही ते म्हणाले होते. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा जन्मही नव्हता, तेव्हापासून मी राजकारणात असल्याचा पलटवार केला होता. शिवाय काहींना आत्तापासूनच आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत, असा टोला युगेंद्र यांचे नाव न घेता लगावला होता.

बारामतीत चर्चेला उधाण

आता निवडणूकीनंतर युगेंद्र यांना बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदावरून हटविले जावू शकते. युगेंद्र याबाबत म्हणाले, मला हटविण्यासाठी परवा एका ठिकाणी बैठक झाल्याचे माझ्या कानावर आले आहे. पण माझ्याकडे अद्याप अधिकृत पत्र आलेले नाही.
निवडणूक झाल्यानंतरच ही चर्चा सुरू झाली आहे. असा प्रश्न केला असता युगेंद्र पवार म्हणाले की, ही केवळ चर्चा आहे. कोणी कशावरही चर्चा करेल. मात्र प्रत्येक चर्चा खरीच असते असे नाही. गेली तीन ते चार वर्षांपासून कुस्तीगीर संघाची जबाबदारी माझ्याकडे आहे. या काळात आपण खूप कामे केली आहेत. अजित दादांनी पण खूप मदत केली आहे.

हकालपट्टी अधिकृत नाही!

लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या बाजूने काम केल्याची ही पोच पावती आहे काय..? असे विचारले असता ते म्हणाले की, अद्याप याबाबत माझ्याकडे अधिकृत काहीही आले नाही. मात्र तुम्ही याबाबत जो अर्थ लावायचा असेल तो लावू शकता. यासंदर्भात जर काही पत्र व्यवहार झाला तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मी भेट घेईल असे ते म्हणाले.

सुप्रिया सुळेंचा विजय निश्चित होता…

सुप्रिया सुळे यांच्या विजयाबाबत बोलताना ते म्हणाले की, जे आम्हाला अपेक्षित होते ते झाले आहे. सर्व कार्यकर्त्यांच्या कष्टाला फळ मिळाले. सुप्रिया सुळे विजयी झाल्या याचा आम्हाला आनंद आहे.

विधानसभेला योगेंद्र पवार v/s अजित पवार?

बारामतीत विधानसभेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र हेच शरद पवार गटाकडून उमेदवार असतील, असे बोले जात आहे. या पार्श्वभूमीवर युगेंद्र यांचे पंख छाटण्याचा हा प्रयत्न आहे का, अशी चर्चा बारामतीत सध्या सुरु आहे.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news