लोकसभा विरोधी पक्ष नेतेपदी राहुल गांधींची होणार निवड

काँग्रेस नेते राहुल गांधी. ( संग्रहित छायाचित्र )
काँग्रेस नेते राहुल गांधी. ( संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा विरोधी पक्ष नेतेपदी राहुल गांधी यांची निवड हाेण्‍याची शक्‍यता आहे, असे वृत्त 'पुढारी न्‍यूज'ने दिले आहे. दोन दिवसांमध्‍ये काँग्रेस संसदीय मंडळाची बैठक होणार आहे. लवकर काँग्रेसकडून याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

येत्‍या दोन दिवसांमध्‍ये काँग्रेस संसदीय मंडळाची बैठक होणार आहे. यामध्‍ये राहुल गांधी यांच्‍या नावाची घोषणा होण्‍याची शक्‍यता आहे. लोकसभा विरोधी पक्ष नेत्‍याला मंत्रीपदाचा दर्जा असतो. तसेच विरोधी पक्ष नेता हा भावी पंतप्रधान म्‍हणूनही ओळखला जातो. नुकत्‍याच झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ९९ जागांवर विजय मिळवला आहे. यामध्‍ये राहुल गांधी यांचे योगदान मोठे आहे. त्‍यामुळेच आता राहुल गांधी यांच्‍याकडेच लोकसभा विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी सोपविण्‍यात येईल, अशी शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

मागील दोन निवडणुकीत सभागृहाला नव्‍हता अधिकृत विरोधी पक्ष नेता

२०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपला स्‍पष्‍ट बहुमत मिळाले. तब्‍बल ३०३ जागांवर भाजपने तर एनडीएचा ३५३ जागांवर विजय झाला होता. काँग्रेसप्रणित संयुक्‍त पुरोगामी आघाडीला केवळ ९२ जागांवर समाधान मानावे लागले होते. यामध्‍ये काँग्रेसला केवळ ५२ जागा मिळाल्‍या होत्‍या. २०१४ मध्‍येही काँग्रेसला केवळ ४४ जागांवर विजय मिळला होता. त्‍यामुळे मागील दोन्‍ही वेळी सभागृहातला अधिकृत विरोधी पक्षनेताच नव्‍हता.

विरोधी पक्ष नेतेपदासाठी किती जागा आवश्‍यक ?

नियमानुसार, लोकसभा निवडणुकीत ज्‍या राजकीय पक्षाला १० टक्‍के जागा मिळतात त्‍याच पक्षाला अधिकृतपणे लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळते. म्‍हणजे लोकसभेच्‍या ५४३ जागांपैकी किमान ५५ खासदार असणार्‍या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळते. २०१४ आणि २०१९ काँग्रेसला अनुक्रमे ४४ आणि ५२ जागा मिळाल्‍या होत्‍या. त्‍यामुळे पक्षाचा अधिकृत विरोधी पक्षनेता नव्‍हता. यंदाच्‍या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ९९ जागांवर विजय मिळवला आहे. त्‍यामुळे आता पक्षाला अधिकृत विरोधी पक्षनेतेपद मिळणार आहे. त्‍यामुळेच यंदा विरोधी पक्ष नेतेपदासाठी राहुल गांधी यांचे नाव अग्रस्‍थानी असल्‍याचे समजते.

विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका ठरते महत्त्‍वपूर्ण

केंद्रीय अन्‍वेषण विभाग (सीबीआय) प्रमुख, माहिती आयोग प्रमुख, सर्वोच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायाधीश तसेच अन्‍य घटनात्‍मक अतिमहत्त्‍वाच्‍या पदावरील नियुक्‍तंमध्‍ये विरोधी पक्ष नेत्‍याची भूमिका अत्‍यंत महत्त्‍वपूर्ण ठरते. प्रभावी विरोधी पक्ष हा सरकारच्‍या निरंकुश कारभारावर नियंत्रण ठेवतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news