

पुणे: मराठा आरक्षण प्रश्नावर जे कोणी काही सूचना करतात ते दहा-दहा वर्ष सरकारमध्ये होते. उगीचच आम्हाला त्या खोलात जायला लावू नका. ते सर्व आदरणीय, पूजनीय, वंदनीय मान्यवर आहेत. मला त्याबद्दल खोलात जायचं नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केली.
व्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये विविध विभागांच्या बैठका अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी घेण्यात आल्या. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. (Latest Pune News)
अजित पवार म्हणाले, शरद पवार हे तामिळनाडू आरक्षणासंदर्भात बोलत असले तरी ते आरक्षण कधी देण्यात आले हे पाहावे. आरक्षणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या आधीच तामिळनाडू राज्याने ते आरक्षण लागू केले आहे.
मुंबई येथे मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. त्यांना शिंदे समितीचे सदस्य भेटायला गेले होते याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, अशावेळी प्रयत्न करणे हे काम असते. राज्य सरकार याबाबत युद्धपातळीवरचे प्रयत्न सुरू आहेत.
सरकारची भूमिका सकारात्मक आहे. यातून मार्ग निघालाच पाहिजे, हीच भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आहे. या समितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत. त्यांच्या समितीतील सर्व सदस्य बसून चर्चा करतील. चर्चेतून मार्ग निघू शकतो, आजवरचा अनुभव असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
परिस्थिती चिघळली तर त्याला जबाबदार फडणवीस असतील, असे वक्तव्य जरांगे यांनी केले होते. त्याबाबत विचारले असता पवार म्हणाले, जे कोणी आंदोलन करतात. ती त्यांची भूमिका मांडत असतात. लोकशाहीत संविधानाने त्यांना तो हक्क दिला आहे.
त्यामुळे त्यांनी त्यांचे मत मांडले आहे. आम्ही त्यातून मार्ग काढण्याकरिता सरकार वेगवेगळ्या पातळीवर चर्चा करत आहे. हे सगळं सामोपचाराने मिटेल, उपोषण कसे संपेल हा प्रश्न राज्य सरकार करत आहे. या आंदोलनादरम्यान फडणवीस एकटे पडत नाहीत, असेही त्यांनी या वेळी सांगितले.