

पुणे: थेऊर येथील यशवंत सहकारी कारखान्याची जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीला विकण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. हा व्यवहार पणन विभाग (बाजार समिती) आणि सहकार विभाग (साखर कारखाना) यांच्याशी संबंधित आहे. दोन्ही संस्था शेतकर्यांच्या मालकीच्या असून त्या हवेली तालुक्यातील आहेत.
या व्यवहाराचे योग्य मूल्यांकन काढण्यात आले आहे आणि सर्व व्यवहार चेकद्वारे होणार आहे. त्यामुळे यात गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. व्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये विविध विभागांच्या आढावा बैठका अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
या वेळी अजित पवार म्हणाले, यशवंत सहकारी कारखान्याबाबत आढावा बैठकीत चर्चा झाली. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उपस्थित होते. ते कसे पैसे उपलब्ध करून देणार आहेत, कशा पद्धतीने संचालक मंडळ पुढे जाणार, याची चर्चा झाली. तसेच त्यांना ज्या काही राज्यस्तरावरील आणि साखर आयुक्त स्तरावरील काही अडचणी आहेत, त्या दूर करण्याबद्दल संबंधित अधिकार्यांना सूचना दिलेल्या आहेत.
या विषयावर निर्णय घेण्याचा अधिकार घटनेने आणि संविधानाने निवडून दिलेल्या मंत्रिमंडळाला आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाला सहसा कोणी आव्हान देऊ शकत नाही. हा निर्णय योग्य असल्याने त्याला चुकीचा म्हणण्याचे कोणतेही कारण नाही.